लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ४२ दिवसांच्या लॉकडाऊननंतर आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यात अडकलेल्या मजुरांना जिल्ह्यातील विविध भागात घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाची पहिली बस चंद्रपूर आगारातून रविवारी रवाना झाली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा अंतर्गत बस सुरू करण्याची सूचना केल्यानंतर महामंडळाच्या बसेसची थांबलेली चाके गतिशील झाली.तेलंगणा राज्यातून हैदराबाद येथून चंद्रपूर जिल्ह्यातील अडकलेल्या मजुरांना घेऊन त्या राज्याची बस रविवारी चंद्रपूर बसस्थानकात आली. त्यामुळे हैद्राबादवरून चंद्रपूरला पोहोचलेल्या मजुरांना पुढे कसे जावे, हा प्रश्न होता. पालकमंत्री कार्यालयाशी त्यांनी संपर्क साधल्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सूचना केली. त्यानंतर सिंदेवाही, नागभीड, मूल, ब्रह्मपुरी तालुक्यांच्या गावाला जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली. सोमवारपासून राज्य शासनाने मजुरांना एसटी बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रविवारीच हे मजूर चंद्रपूरमध्ये पोहचल्यामुळे २६ जणांच्या ताफ्याला मूल, सिदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी येथे रवाना करण्यात आले.तत्पूर्वी, गेल्या अनेक दिवसांपासून आगारात जमा असलेल्या एसटी बसेसचे सॅनिटायझेशन करण्यात आले. तसेच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रवाशांनादेखील आवश्यक वैद्यकीय सल्ला व शारिरिक अंतर राखण्याचे निर्देश दिले गेले. केवळ २६ नागरिकांना या बसमधून रवाना करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक सचिन डफळे व आरोग्य पथक उपस्थित होते.राजुऱ्यातून दहा बसेस रवानातेलंगणातून स्थलांतरित झालेले आणि राजुरा तालुक्यात असलेल्या सुमारे २५० मजुरांना घेऊन राजुरा आगारातून महामंडळाच्या दहा बसेस सोडण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे, नगरसेवक आनंद दासरी, तहसीलदार रवींद्र होळी, राजुरा आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम, मुख्याधिकारी आर्शिया जुही आदी उपस्थित होते सोडण्यात येणाऱ्या दहा बसेस सॅनिटाइझ करण्यात आल्या. प्रत्येक प्रवाश्याची काळजीपूर्वक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर यादीनुसार सर्व मजूर प्रवाशांना बसमध्ये बसविण्यात आले. एसटीचे चालक, वाहक यांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली.
हैदराबादवरून आलेल्या मजुरांना घेऊन एसटी तालुक्याला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 5:00 AM