व्यापारी संघटनेचे आमदार भांगडिया यांना निवेदन
चिमूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य शासनाने ५ एप्रिलपासून निर्बंधासहित लॉकडाऊन घोषित केल्यामुळे सर्वसामान्य जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून सर्व दुकानदार अनेक आर्थिक संकटांचा सामना करत आहेत.
दुकाने बंद असले तरी त्याला दुकानात भरलेल्या सामानाचे देणे, बँकेचे व्याज, किराया, लाईट बिल, कर्मचाऱ्यांचा पगार, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरखर्च व इतर खर्च चालूच आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. शासनाने आयोजित केलेल्या जनता कर्फ्यूमध्ये प्रशासनास वेळोवेळी व्यापाऱ्यांनी सहकार्य करून कोविडचा संसर्ग कमी करण्यात मोलाचे सहकार्य केले आहे. मात्र, आता तरी सर्वसामान्य दुकाने सकाळी ७ ते ११ या मर्यादित वेळेत सुरू करण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी व्यापारी संघटना चिमूरच्या वतीने चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. निवेदन देताना चिमूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण सातपुते, माजी अध्यक्ष प्रमोद बारापात्रे, संघटनेचे सचिव बबन बनसोड, प्रशांत जोशी, राजू बल्दवा, श्रीहरी सातपुते, संजय कुंभारे, गोलू शेख उपस्थित होते.