लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तांदळाचे संशोधक व कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांचे कृषी क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या या कार्याची ज्योत तेवत ठेवायची असेल तर त्यांच्या नावे एखादा पुरस्कार सुरू करावा, अशा भावना अनेक मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदनेत दादाजींच्या अंत्यविधीच्या वेळी शोकसभेत व्यक्त केल्या.दादाजी खोब्रागडे यांचा जन्म चिमूर तालुक्यातील एका आडवळणाच्या खेड्यात झाला. त्यांचे शिक्षण केवळ तिसरीपर्यंत. परिस्थितीमुळे ते पुढे शिक्षण घेऊ शकले नाही. कामाच्या शोधात त्यांचे वडील नांदेडला आले आणि ते येथील रहिवासी झाले. दादाजींची सुरूवातीपासूनच संशोधक वृत्ती. या वृत्तीतूनच त्यांनी आपल्या दीड एकर शेतीत धानाचे पीक घेत असताना १९८३ च्या काळात एचएमटी धानाचे वाण शोधून काढत ते विकसित केले.धानाच्या या एचएमटी वाणाने देशातील सर्व धान पिकाचे विक्रम मोडून काढले. एवढेच नव्हे तर विदेशातही या वाणाचे पीक घेतल्या जात आहे. दादाजींच्या संशोधनाची फोर्ब्स या जागतिक संस्थेने दखल घेतली व जगातील १० शक्तीशाली उद्योजकांच्या यादीत दादाजींना स्थान दिले. यानंतर गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांनी दादाजींच्या संशोधनाची दखल घेतली. राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला. दादाजींचे हे कार्य विद्यापीठात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणाऱ्या संशोधकांनाही लाजवणारे आहे. मात्र महाराष्ट्रात दादाजींच्या संशोधनाची उपेक्षाच झाली आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.या शोकसभेत उत्तर नागपूरचे आमदार मिलिंद माने, अॅड. गोविंद भेंडारकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, प्रफुल्ल खापर्डे, वसंत वारजुकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अण्णासाहेब हसनाबादे, बीआरएसपीचे राजू झोडे यांनीही दादाजी खोब्रागडे यांच्या कार्याचा गुणगौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप यांनी दादाजींना एचएमटी या धानाच्या वाणाचे पेटंट मिळायला पाहिजे. दादाजीने आडवळनावरील एका खेड्यात राहून जे संशोधन केले, त्याला तोड नाही. या वाणाने अनेकांना श्रीमंती प्राप्त झाली. मात्र दादाजी शेवटपर्यंत जसा होता तसाच राहिला, असे विचार मांडले.घराची इच्छा अपूर्णएक वर्षापूर्वी ‘लोकमत’ने त्यांची भेट घेतली असता, दादाजींनी पुरस्कारांच्या जतनाकरिता शासनाने एक छोटेसे घर बांधून द्यावे, अशी इच्छा प्रदर्शित केली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशितही केले होते. परंतु त्यांची ही इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
तांदळाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या नावाने पुरस्कार सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 5:35 PM
तांदळाचे संशोधक व कृषीभूषण दादाजी खोब्रागडे यांच्या या कार्याची ज्योत तेवत ठेवायची असेल तर त्यांच्या नावे एखादा पुरस्कार सुरू करावा, अशा भावना अनेक मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केल्या.
ठळक मुद्देशोकसभेतील भावना शासनाने विचार करावा