किशोर जोरगेवार यांच्या अधिकार्यांना सूचना
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयातील डायलिसिस मशीन मागील एक महिण्यापासून बंद असल्याने रूग्णांना उपचारासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे ही मशीन दोन दिवसात सुरु करावी. मशिन सुरु होईपर्यत संबंधित आजाराच्या रुग्णांची क्राईस्ट हॉस्पीटलमध्ये तपासणीची सुविधा करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी गुरूवारी रूग्णालयाच्या पाहणीदरम्यान दिल्या.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, बांधकाम विभाग क्रमांक २ चे उपविभागीय अभियंता, राजेश चव्हाण, सहाय्यक अभियंता, विवेक अंबुले, यंग चांदा ब्रिगेडचे विलास सोमलवार, हरमन जोसेफ आदी उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यासह - जिल्हाबाहेरील रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. मात्र डायलिसिस मशिन बंद आहे. त्यामुळे किडणीचा आजार असलेल्या रुग्णांना त्रास सहण करावा लागत होता. नाईलाजास्तव रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत होते. त्यामूळे त्यांना आर्थिक भुर्दड सोसावा लागत होता. आमदार जोरगेवार यांनी रुग्णालयाची पाहणी केली असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच उपस्थित वैद्यकीय अधिका-यांना जाब विचारत ही मशीन दोन दिवसात सूरळीत करुन डायलिसिस प्रक्रिया पूर्ववत सुरु करण्याच्या सूचना दिल्या.