चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्याला झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते. झाडीपट्टीत दिवसा शंकरपट किंवा मंडईचे आयोजन करून रात्री नाटकाचे आयोजन केले जाते. ही परंपरा गेल्या दीडशे वर्षापासून सुरू आहे. हे नाट्यप्रयोग अनेक कलावंतांचे उपजीविकेचे साधन बनले आहे. या नाट्यप्रयोगांच्या भरवशावर अनेक कलावंत आपला उदरनिर्वाह करीत आहेत; परंतु गेल्या अठरा महिन्यांपासून कोरोनाच्या टाळेबंदीमुळे नाट्यप्रयोग बंद असल्यामुळे कलावंतांचा रोजगार हिरावला गेला. कित्येक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे झाडीपट्टीतील कलावंत अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलने करून झाडीपट्टीतील नाट्यप्रयोग सुरू करण्याची मागणी रेटून धरीत आहेत. ही बाब मूल तालुक्यातील कलावंतांच्या शिष्टमंडळाने आमदार मुनगंटीवार यांची मूल येथे भेट घेऊन निदर्शनास आणून दिली. झाडीपट्टीतील चारही जिल्हे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. म्हणून झाडीपट्टीचा नाट्यप्रयोग सुरू करण्याची मागणी यावेळी केली. यावेळी ज्येष्ठ कलावंत मुकेश गेडाम, सुनील कुकुडकर, चिदानंद सिडाम, निकेश खोबरे, मंगल मशाखेत्री, संजय मेक्रतीवार, अनिल मोहुर्ले, भास्कर मेश्राम, सुनील मोहुर्ले, आशिष गुरनुले, देवा वासेकर, सुभाष मेश्राम, सोनू कोरांगे, कुंदन कस्तुरे, मोरू घोंगडे, मयूर राशेट्टीवार, दीनेश कोलटवार, तुशार मोटघरे, खोजेंद्र उराडे, रतीलाल कळसकर यांच्यासह अन्य कलावंत उपस्थित होते.
नाट्यप्रयोग सुरू करण्यासाठी कलावंतांचे मुनगंटीवारांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:31 AM