लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता निवडणूक विभागाने आपल्या कामाला गती दिली आहे. निवडणुकीमध्ये वापरण्यात येणारी मतदान संयंत्राच्या प्रथम तपासणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी प्रशासकीय भावनांमध्ये येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केली आहे.मतदान संयंत्रामध्ये असणाऱ्या बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट मशीन, कंट्रोल युनिट व बॅटरी सह सर्व अनुषंगिक घटक व्यवस्थित काम करत आहेत. अथवा नाही याबाबतची तपासणी सध्या चंद्रपूर बसस्थानकासमोरील प्रशासकीय भवनामध्ये सुरू आहे. जिल्हाभरातील सर्व मतदान यंत्र याठिकाणी तपासले जात आहेत. शेकडो कर्मचारी या तपासणीचे काम करत असून या यंत्रामध्ये कोणताही बिघाड राहू नये, कुठलीही दुरुस्ती असू नये, किंवा यंत्र बंद असू नये याबाबतची पूर्ण दक्षता घेतली जात आहे.हे अतिशय सोपे तांत्रिक काम असून ईव्हीएम मशीन बाबत ज्यांच्या मनात कुठलीही शंका असेल, अशा सर्वांनी या प्रक्रियेला समजून घ्यावे, असे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना देखील सादर आमंत्रित केले आहे. कार्यालयीन वेळेमध्ये या दुरुस्तीचे काम आणखी काही दिवस सुरू राहणार असून सर्वांनी या प्रक्रियेला समजून घ्यावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
मतदान संयंत्राच्या प्रथम तपासणी मोहिमेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:55 AM