पोंभुर्णा : शासन परिपत्रानुसार कोविड नियमाचे पालन करीत शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यातील इयत्ता ८ ते १२वीचे वर्ग सुरळीतपणे सुरू करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आलेले आहेत. याच पत्राच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कोविडमुक्त भागातील शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत हजबन, सचिव संदीप ढोबळे, सदस्य रमेश सातपुते यांनी केली आहे.
सिरपूर स्मशानभूमीत होणार शोकसभा मंडप
पळसगाव (पि) : नेरीवरून जवळ असलेल्या ग्रामपंचायत, सिरपूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात स्मशानभूमीमधील शोकसभा मंडप आणि गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचाही समावेश आहे. जिल्हा परिषद सदस्य मनोज मामीडवार यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. या वेळी सरपंच वैशाली निकोडे, उपसरपंच राजू भानारकर, जयपाल गावतुरे, जीवन बोरकर, पुष्पा कापगते, सुनीता कुंभरे, लता काळसरपे आदी उपस्थित होते.
लसीकरणाकडे पेंढरीवासीयांची पाठ
पेंढरी (कोके) : कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना सोयीचे व्हावे, म्हणून ग्रामीण भागातील गावांमध्येही लसीकरण केंद्र ग्रामपंचायत व आरोग्य केंद्राच्या मदतीने आयोजित करण्यात आले. मात्र, येथील नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. ४५ वर्षे वयावरील फक्त ११९ लोकांनी, तर १८ वर्षांवरील फक्त ७४ युवकांनी लाभ घेतला.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागांत सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे.
पुलावर कठड्याअभावी अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला. परंतु, कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. यापूर्वी अनेकदा याकडे लक्ष वेधण्यात आले. मात्र बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
जुन्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ
घुग्घुस : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने प्रदूषण वाढले आहे.
बसअभावी प्रवाशांची गैरसोय
शंकरपूर : शंकरपूर-भिसी या मार्गाने एकही बस उपलब्ध नसल्याने बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. भिसी अप्पर तालुका असून शासकीय कामासाठी येथे जावे लागत आहे. तसेच इतर कामासाठीही नागरिकांना या रस्त्याने जाणे-येणे करावे लागते. मात्र बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.
मातीच्या ढिगाऱ्यावर झुडपे वाढली
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलीने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहेत. या ढिगाऱ्यावर झुडपी जंगल निर्माण झाले असल्याने धोका होण्याची शक्यता आहे.
नाल्यांचा उपसा करण्याची मागणी
सावरगाव : नागभीड तालुक्यातील जीवनापूर येथील नाल्यांचा उपसा न झाल्याने नाल्या सांडपाण्याने तुंबल्या आहेत. काही भागांत नालीचे पाणी बाहेर वाहत असून ते लोकांच्या घरात जात आहे. ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन नाल्यांचा उपसा करण्याची मागणी होत आहे.
दिव्यांगांना ५ टक्के निधी देण्याची मागणी
खडसंगी : चिमूर तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी दिव्यांगांचा ५ टक्के निधी अखर्चित ठेवला आहे. हा निधी दिव्यांगांना वितरित करण्यात यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कोरोनाने आर्थिक संकट असल्याने त्यांना त्वरित निधी द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या वेळी विनोद उमरे, रमेश वाकडे, आदित्य कडू, मुरलीधर रामटेके, नारायण निखाडे, संदीप निखाडे, सचिन घानोडे, स्वप्निल खोब्रागडे उपस्थित होते.