चंद्रपूर : कोरोना प्रादुर्भावामुळे अजूनही शाळा सुरू झाल्या नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सद्य:स्थितीत कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शासनाकडे केली आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे.
शाळा बंद असल्याने विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. कोरोना नियमांचे पालन करून प्राथमिक शाळा सुरू कराव्यात, १ जानेवारी २००४ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या वेतन निश्चितीत होणारा अन्याय दूर करावा, जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसंदर्भातील बीडीएस प्रणाली तत्काळ सुरू करावी, सहावी ते आठवीला शिकविणाऱ्या सर्वच पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी शंभर टक्के पदांना लागू करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यासंदर्भात नायब तहसीलदार एस. भांदककर, गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिंग, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार यांच्या मार्फतीने शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिकचे अमोल देठे, विलास बोबडे, सुनील टोंगे, विनोद बाळेकरमकर, छत्रपती राऊत, विलास खाडे, शंकर निखाडे, विनोद गौरकर, विलास मेश्राम, संदीप गराटे, सचिन जांभुळे आदी उपस्थित होते.
बाॅक्स
पालकांनी केले स्वागत
शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने अद्यापही ठाेस निर्णय घेतला नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. आई-वडील शेतात जातात. त्यामुळे मुले दिवसभर इकडे तिकडे सारखे फिरतात. त्यामुळे आई-वडिलांना मुलांबाबत चिंता सतावत आहे. एकदाची शाळा सुरू झाल्यास मुले शाळेत सुरक्षित राहतील, असा त्यांना विश्वास आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शाळा सुरू करण्यासंदर्भात पुढाकार घेतला असून, यासंदर्भात शासनाला निवेदन दिले आहे. यामुळे पालकांनी शिक्षक परिषदेचे कौतुक केले आहे.