वनमंत्र्यांचा उपक्रम : ‘चला आपल्या ताडोबाला’ चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयातील शालेय विद्यार्थ्यांना व्याघ्र प्रकल्प तसेच वनसंवर्धनाचे महत्व पटविण्यासाठी तसेच वन्यजीव व वनसंवर्धनासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या जाणिवा अधिक समृध्द होण्याच्या दृष्टीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत १७ सप्टेंबरपासून चंद्रपूर जिल्हयातील विद्यार्थ्यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नि:शुल्क शैक्षणिक सहल ‘चला आपल्या ताडोबाला’ या शिर्षकाखाली घडविण्याचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.१७ सप्टेंबरला दुपारी २ वाजता चंद्रपूर शहरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या शैक्षणिक सहलीसाठी बसेसला हिरवी झेंडी दाखवून उपक्रमाचा शुभारंभ करतील. यावेळी आ. नाना श्यामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती देवराव भोंगळे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक गरड, चंद्रपूर वनव़ृत्ताचे मुख्य वनसंरक्षक शेळके आदींची उपस्थिती राहणार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील महत्वपूर्ण व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ करण्याच्या दृष्टीने वनविभागाची वाटचाल सुरू आहे. हमखास व्याघ्र दर्शनासाठी या प्रकल्पाला देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकदेखील भेट देत असतात.चंद्रपूर जिल्हयातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थी या महत्वाच्या वन पर्यटनापासून वंचित राहतात. वास्तविक जिल्हयातील वनसंवर्धन व व्याघ्र संवर्धनामध्ये वनाजवळ राहणाऱ्या गावकऱ्यांची महत्वाची भूमिका आहे.चंद्रपूर जिल्हयातील शालेय विद्यार्थ्यांना व्याघ्र प्रकल्प तसेच वनसंवर्धनाचे महत्व समजणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळा, आश्रमशाळा, अनाथाश्रमातील विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी अशा सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार आहे.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेपासून नेण्याची व आणण्याची सोय ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत करण्यात येणार आहे. हा उपक्रम वर्ग ४ ते १० या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या नि:शुल्क ताडोबा भ्रमंतीला आजपासून प्रारंभ
By admin | Published: September 17, 2016 1:30 AM