गावागावात अस्वच्छता वाढली
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील काही गावांमध्ये अस्वच्छता बघायला मिळत आहे. काही नागरिकांनी शोषखड्डे केले आहे. मात्र तेही तुडूंब भरल्यामुळे यातील पाणी रस्त्यावर येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
वृक्षतोडीला प्रतिबंध घालण्याची मागणी
चंद्रपूर : वनविभाग व विविध सामाजिक संघटनेच्यावतीने नागरिकांमध्ये वृक्षतोड न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. परंतु जिल्ह्यातील काही ठिकाणी वृक्षतोड केली जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात काही जण पावसाळ्यापूर्वी सरपणासाठी वृक्षतोड करतात.
हागणदारीमुक्तीचा फज्जा
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये विशेषत: दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये हागणदारीमुक्तीचा फज्जा झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच गुडमार्निंग पथकही गायप झाले आहे.काही गावात नागरिक रस्त्याच्या मुख्य मार्गावरच उघड्यावर शौचास बसत आहेत. याकडे संबंधित विभागाच्या नागरिकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
तलाठी नसल्याने नागरिक त्रस्त
चंद्रपूर: सध्या शेतीच्या कामाची लगबग सुरु आहे. मात्र जिल्ह्यातील काही गावांमध्ये तलाठीच नसल्याने शेतकऱ्यांन त्रास सहन करावा लागत आहे. संबधित विभागाने दखल घेऊन येथे तलाठ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जीम सुरू करण्याची परवानगी द्या
चंद्रपूर : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात जीम संचालकांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे जीम केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी जीम व्यावसायिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, लॉकडाऊननंतर अनेकांची जीममध्ये व्यायाम करण्याची सवयही तुटली आहे.
कचरा संकलकांचे वेतन वाढवा
चंद्रपूर : शहरातील कचरा संकलित करणाऱ्यांना अत्यल्प वेतन दिल्या जात असल्यामुळे त्यांना कुटुंबाचे पालन पोषण करताना मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागतो. लॉकडाऊनच्या काळामध्येही त्यांनी आपले कार्य चोखपणे बजावले आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलकांचे वेतन वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.