लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय स्टेट बँकेतील गृहकर्ज १४ कोटी २४ लाखांच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची बाब पोलीस तपासात पुढे येत आहे. या प्रकरणातील तांत्रिक बाबींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून फसवणुकीची रक्कमही वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूने खोलात जाऊन तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली. या घोटाळ्यामध्ये बिल्डर, आयकर सल्लागार, मूल्यनिर्धारकांसह अनेक बड्या हस्तींचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात गुरुवारी १२ कर्जधारकांसह तीन बँक अधिकाऱ्यांना जामीन मंजूर झाला. या प्रकरणात शेळके, जावडेकर, चांदूरकर आणि मूल शाखेतील वरीयाणी ही मंडळी फरार आहेत. फसवणूक प्रकरणाची माहिती लीक झाल्याने ही मंडळी आर्थिक गु्न्हे शाखेचे पथक मुंबई व नागपूरला पोहोचण्यापूर्वीच फरार झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे मजुरांच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून कर्ज दिले गेल्याची माहितीही पुढे येत आहे. तीन वर्षांपासून भारतीय स्टेट बँकेत शहरातील नामांकित बिल्डरांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून १४ कोटी २६ लाखांनी बँकेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने २३ व २४ फेब्रुवारी रोजी एजंटसह १२ कर्जधारकांना अटक केल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी बँकेचे व्यवस्थापक पंकजसिंग सोळंकी, व्यवस्थापक विनोद लाटेलवार, मुख्य क्रेडिट व्यवस्थापक देविदास कुळकर्णी यांना अटक केली. बँकेच्या नागपूर शाखेतील व्यवस्थापक उज्ज्वल शेळके यांच्यासह मुंबई येथील चांदूरकर, जावडेकर हे दोन अधिकारी व मूल शाखेत कार्यरत अधिकारी वरियाणी व इतर ठिकाणी कार्यरत असलेले दोन अधिकारी असे एकूण पाच अधिकारी फरार आहेत. या पाचही जणांना अटक करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत आहे. यातील एक तेलंगणा राज्यातील मूळ रहिवासी असलेला व बँकेत अधिकारी पदावर काम करणारा आणि सध्या बँकेनेच त्याची एजंट म्हणून नियुक्त केलेला सेवानिवृत्त अधिकारीही फरार आहे. हाच अधिकारी या फसवणूक प्रकरणातील मुख्य कारभारी असल्याची चर्चा बँकेच्या वर्तुळात आहे. बिल्डर व बँकेतील कर्ज विभागातील मुख्य दुवा हाच अधिकारी होता, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, बँकेने नियुक्त केलेले मूल्यधारक, बिल्डर तथा बनावट आयकर विवरण तयार करून देणारे आयकर सल्लागार यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातही बिल्डर सहभागी आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर व मुंबई येथे पोहोचले तेव्हा शेळके, चांदूरकर व जावडेकर हे बँकेचे तीन वरिष्ठ अधिकारी फरार झाले होते, अशी माहिती तपास अधिकारी दीपक मस्के यांनी दिली.
मोखळाला-रमण जोडी चर्चेतस्टेट बँक ऑफ इडियाच्या मुख्य शाखेचे क्षेत्रीय प्रबंधक मोखळाला हे हा कर्ज घोटाळा झाला तेव्हा होते. तर कर्ज प्रकरणे डी. व्ही. रमण या अधिकाऱ्याच्या माध्यमातून होत होती, अशी माहिती पुढे येत आहे. हे दोन्ही अधिकारी बँकेतून सेवानिवृत्त झाले असून ते मूळचे तेलंगणातील रहिवासी आहेत. उल्लेखनीय, रमण यांना बँकेने सेवानिवृत्तीनंतर एजंट म्हणून नियुक्त केल्याचे बोलले जात आहे. गृहकर्ज घोळाटा प्रकरण उघडकीस आल्यापासून मोखळाला व रमण या जोडीची चर्चा आहे.
सुप्रीम फरार - या घोटाळ्यात सुप्रीम नावाच्या एजंटचे नावही जोडले जात आहे. कारागृहातून सुटलेल्यांनी याच एजंटचे नाव घेतले आहे. एका सदनिकेत एका नामांकित बिल्डरने एकाच मजल्यावरील एक फ्लॅट २९ लाखांत व बाजूचा फ्लॅट ५१ लाखांत बँकेचे कर्ज घेवून विक्री केला आहे. या प्रकरणातही बनावट कागदपत्रे तयार केली आहेत. हा सुप्रीम नावाचा एजंट फरार आहे.