चंद्रपूर : आठवडाभरापूर्वी येथील एक लग्न सोहळ्यातून ४० तोडे सोने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असतानाच चंद्रपूर मार्गावरील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत दरोडा पडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दरोडेखोरांनी बँकेतील आलमारीचे लॉकर फोडून तब्बल साडे चौदा लाखांची रोकड लांबवल्याची माहिती आहे. यापूर्वी वरोरा तालुक्यातील बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये असा दरोडा पडला होता. या घटनेने शहरात मोठी खडबड उडाली आहे.
चंद्रपूर एमआयडीसी मार्गावर स्टेट बॅंक ऑफ इंडियाची शाखा आहे. ही शाखा पडोली पोलिस ठाण्यातंर्गत येते. शनिवार व रविवार अशा सलग दोन दिवस बॅंकेला सुट्ट्या असल्याने ही बँक बंद होती. हीच बाब हेरुन दरोडेखोरांनी शनिवारी किंवा रविवारच्या मध्यरात्री बॅंक फोडून बॅंकेत प्रवेश केला. बँकेतील आलमारीचे लॉकर तोडत चोरांनी त्यामध्ये ठेवलेली जवळपास साडे चौदा लाखांची रोकड पळवली.
सोमवारी सकाळी बँक उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. लगेच नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार व त्यांच्या चमूने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. परंतु, अद्यापही काही समोर आले नाही.
सीसीटीव्हीवर मारला स्प्रे
चोरट्यांनी बॅंक फोडून बॅंकेत प्रवेश केल्यानंतर सीसीटिव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला होता. ऐवज संपूर्ण लुटल्यानंतर त्यांनी सीसीटिव्हीचा डीसीआरही पळविल्याची माहिती आहे. त्यामुळे सीसीटिव्हीमधून चोरट्याचा काही थांगपत्ता लागू शकला नाही.
नव्या ठाणेदारापुढे आवाहन
नुकत्याच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या. पडोली पोलीस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक म्हणून सुनीलसिंग पवार हे रुजू झाले आहे. याला आठवडला उलटल्यानंतरच ही घटना घडली आहे. त्यामुळे आता चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन नव्या ठाणेदारांपुढे उभे ठाकले आहे.