चंद्रपूर : चंद्रपुरात दारू पूर्ववत सुरू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभाग चांगलाच चर्चेत होता. अशातच मंगळवार, दि. ७ मे रोजी बीअर शाॅपीच्या परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खाताड हे तीन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती. चंद्रपुरात पहिल्यांदाच राज्य उत्पादक शुल्क विभागाचा मोठा अधिकारी लाच प्रकरणात अडकल्याचे समजते. या कारवाईसाठी नागपुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सर्व अधिकारी चंद्रपुरात दाखल झाले. तिघांवरही रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांनी दिली.
तक्रारदाराने नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे बीअर शॉपीच्या परवान्यासाठी रितसर अर्ज केला होता. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खरोडे यांच्याकडून परवाना देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात होती. दरम्यान, खरोडे यांनी परवाना मंजूर करण्यासाठी स्वत:सह अधीक्षक संजय पाटील यांच्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली. लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीच्या आधारे चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. दरम्यान, दुय्यम निरीक्षक खारोडे यांनी कार्यालय अधीक्षक अभय खाताळ यांच्यामार्फत एक लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्यानुषंगाने तिघांवरही कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूरच्या पोलिस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांच्या नेतृत्वात पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे, हिवराज नेवारे, संदेश वाघमारे, राकेश जांभूळकर, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम आदींनी केली.अन् तिन्ही अधिकारी अलगद जाळ्यात
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकाविरुद्ध लाच मागितल्याची तक्रार असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील पावले अतिशय सावधगिरीने उचलण्यात आली. ही कारवाई फत्ते करण्यासाठी तीन दिवसांचा सापळा रचना आला होता. यामध्ये २४ एप्रिल २०२४, ३ मे २०२४, ७ मे २०२४ रोजी अशी तीनवेळा पडताळणी करण्यात आली. यामध्ये लाच मागितल्याचे जवळपास निश्चित झाल्याने अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीनही अधिकारी अलगद जाळ्यात अडकले. अधीक्षक संजय पाटील यांच्या घराचीही पोलिसांनी झडती घेतली. यामध्ये काय आढळले हे मात्र कळू शकले नाही.