लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : शेतमाल तारण योजनेत ‘क’ व ‘ड’ वर्गातील बाजार समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार गोंडपिपरी बाजार समितीने पटकाविला आहे. सोलापूर येथील वृंदावन लॉन भवन येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे पणन व वस्त्रोद्योग सहकार मंत्री नामदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते एक लाख एक हजार रुपयाचा धनादेश, सन्मानपत्र व मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.शेतकऱ्यांचा शेतमाल कमी दराने विक्री न करता तारण योजनेत बाजार समिती गोदामात ठेवायचा आणि भावात वाढ झाली की उच्च दरात विक्री करायची, याकरिता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे ही शेतमाल तारण योजना राबवित आहे. गोंडपिपरी बाजार समितीचे सभापती सुरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील एकूण १५५ शेतकऱ्यांनी आपला शेतमाल धान वजन ५६२३.०० क्विंटल गोंडपिपरी बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवून शेतकऱ्यांना ७५ टक्के रक्कम एक कोटी चार लाख १५ हजार ९५७ रुपये देण्यात आली.सन २०१७-१८ या वर्षात शेतकºयांना एकूण ५५ लाख रुपये फायदा मिळाला आहे. यामध्ये राज्यातील नऊ बाजार समित्यांना पुरस्कृत करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणेचे कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यस्थापक दीपक शिंदे, उपसरव्यवस्थापक प्रशांत सूर्यवंशी, सहाय्यक व्यवस्थापक दिलीप नाईक, जिल्हा उपनिरबंधक पुणे अविनाश देशमुख उपस्थित होते.
गोंडपिपरी बाजार समितीला शेतमाल तारण योजनेचा राज्यस्तरीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 10:01 PM