सुधीर मुनगंटीवार : ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ उपक्रम राबविण्याची सूचनाचंद्रपूर : जिल्हयाच्या ग्रामीण भागातील जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवत पूर्ण बहुमतासह जिल्हा परिषदेची सत्ता सोपविली. जनतेच्या या विश्वासाला पूर्णपणे सार्थ ठरवत चंद्रपूर जिल्हा परिषद जनतेच्या सर्व आशा आकांक्षांची पूर्तता करणारी आदर्श जिल्हा परिषद ठरेल यादृष्टीने जनतेची सेवा करण्याचे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या या जिल्हा परिषदेच्या पाठिशी महाराष्ट्राचे मंत्रालय खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिली.चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज सोमवारी जि.प. अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी त्यांना शुभेच्छा देताना ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, फार पूर्वीच्या काळात जिल्हा परिषदांचे काम कमीशन मोडवर चालायचे. आता जनतेने जिल्हा परिषदांची सत्ता भाजपाकडे सोपविली आहे. त्यामुळे आता मिशन मोडवर काम करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जी लाल दिव्याची गाडी मिळाली आहे, ती आपला सन्मान वाढविण्यासाठी नसून दीन, दुर्बल, शोषित, पिडीत नागरिकाचा सन्मान वाढावा, यासाठी आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने आपल्या मतदार संघातील नागरिकांना आपला अभिमान वाटेल, असे काम करावे. जिल्हा परिषदेत बसताना सर्वसामान्य माणुस आपल्या डोळयासमोर कायम ठेवावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.जनतेच्या समस्यांची तातडीने सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जिल्?हा परिषद आपल्या दारी हा उपक्रम राबवत जिल्हा परिषदेचे फिरते कार्यालय स्थापन करण्याची सूचना ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. सी.एस.आर. च्या माध्यमातुन या कार्यालयासाठी बस आपण उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. विविध प्रकारचे दाखले, शाळेच्या समस्या, पेयजल समस्या अशा अनेक समस्या ग्रामीण भागातील नागरिकांना सातत्याने भेडसावत असतात. या समस्यांची प्राधान्याने सोडवणूक करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरेल, असेही ते म्हणाले. हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिला उपक्रम ठरेल व तो मान चंद्रपूर जिल्हा परिषदेने प्राप्त करावा, असेही त्यांनी सुचित केले. महाराष्ट्राचे तसेच केंद्र सरकारचे अनेक पुरस्कार आहेत. ते प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रभावी कार्य करणे गरजेचे आहे. जनसामान्यांच्?या प्रश्नांशी संबंधित अनेक फाईल्स प्रलंबित असतात. त्यांचा जलदगतीने निपटारा व्हावा यादृष्टीने फाईल ट़्रॅकींग पध्दत विकसित करावी. त्या माध्यमातुन सात दिवसापेक्षा काळ एकही फाईल प्रलंबित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रत्येक सोमवारी अधिकारी व पदाधिकारी यांनी मुख्यालयी राहावे व जनतेच्या समस्या सोडवाव्या तसेच जिल्हा परिषद आणि सभापतींनी आठवडयात एकदा प्रत्येक तालुक्यातील संवर्ग विकास अधिकारी कार्यालयात बसून जनसंपर्क करावा व नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. जिल्हा परिषदेचे कामकाज लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने उपयुक्त उपक्रम सातत्याने राबविण्याचे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या ६०० शाळा डिजीटल करण्यासाठी आपण हाती घेतल्या आहेत. मानव विकास मिशनच्या माध्यमातुन शिक्षणासाठी आपण भरीव मदत करू, पर्यावरणयुक्त गाव योजनेसाठी वनविभागाच्या माध्यमातुन मदत करू, असेही ते म्हणाले. २०२१ पर्यंत जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात भाजी क्लस्टर, हळदी क्लस्टर असे विविध प्रकारच्या क्लस्टर्स आपण विकसित करणार आहोत. अशा पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची प्रक्रिया आपल्याला पुढे न्यायची आहे. हा जिल्हा देशातील मॉडेल जिल्हा व्हावा, या जिल्हा परिषदेच्या योजना पथदर्शी व्हाव्या, अशी अपेक्षा यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचीही उपस्थिती होती. ना. हंसराज अहीर यांनी जिल्?ा परिषद अध्?ाक्ष व सदस्यांना जनसमस्या सोडविण्याच्या प्रक्रियेमध्ये झोकुन देत उल्लेखनिय कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी आ. नाना शामकुळे, आ. संजय धोटे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्णा सहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंग, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आदींसह सर्व जिल्हा परिषद सदस्य, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याची मोठया संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
राज्याचे मंत्रालय, मिनी मंत्रालयाच्या पाठिशी उभे राहणार
By admin | Published: April 04, 2017 12:38 AM