वाहतूक ठप्प : दिवसातून १५ वेळा गेट बंदराजुरा : राजुरा-आसिफाबाद रोडवरील रेल्वे गेट विद्यार्थी व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.रेल्वेगेटच्या बाहेर शिवाजी महाविद्यालय, आदर्श मराठी प्राथमिक शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, न्यु एरा इंग्लिश कॉन्व्हेंट आहे. यामध्ये जवळपास १० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. नेमके शाळेत जायच्या वेळेलाच गेट बंद पडते. दिवसातून १०-१५ वेळा गेट बंद पडत असून अर्धा- अर्धा तास गेट बंद असते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची मोठी रांगच उभी होते.या रेल्वे गेटचा फायदा सामान्य नागरिकांना मुळीच नाही. केवळ उद्योगांमध्ये निर्मित सिमेंटच्या वाहतुकीसाठी रेल्वेगेट तयार झाला. वर्षाला कोट्यवधीचा नफा कमविणाऱ्या या कंपन्यानी याठिकाणी उड्डाण पूल तयार करुन देणे गरजेचे आहे. या रेल्वेगेटजवळ मोठमोठे खड्डे पडले आहे. दोन महिन्यांपूर्वी तयार केलेला रस्ता निकृष्ट कामामुळे उखडून गेला आहे. त्यामुळे अनेकवेळा अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. सिमेंट कंपन्या झाल्या, हे ठिक झाले. परंतु राजुरा शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार संतापदायक आहे. या रेल्वेगेटजवळ डिवायडर नसल्यामुळे गाडी गेल्यानंतर नेहमी गर्दी होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपघातसुद्धा होऊ शकतो. या गेटवर उड्डान पूल न बांधल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
राजुऱ्याचे रेल्वेगेट ठरत आहे डोकेदुखी
By admin | Published: January 07, 2016 1:31 AM