रमेश दहिवडे : विदर्भ वन कामगार संघटनेचा मेळावालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ज्यांना आई - वडिलांचा पत्ता नाही. ज्यांना जात नाही. स्वत:चे आडनावदेखील माहिती नाही, अशा अनाथ मुलांना अनाथ आश्रमाचा आश्रय घ्यावा लागतो. त्यांच्या निवास, जेवणाची व्यवस्था अनाथ आश्रमाच्या वतीने केली जाते. तरीही या मुलामुुलींना १८ वर्ष पूर्ण होताच अनाथ आश्रमातून काढून टाकले जाते. स्वत:ची काही ओळख नाही, खिशात रुपया नाही, अशा अवस्थेत त्यांना कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. याच अवस्थेत आज वन कामगारांनाही जगावे लागत आहे, अशी टीका विदर्भ वनकामगार संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी केली.वन कामगारांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. दहिवडे म्हणाले की, काम असताना ९० दिवस पूर्ण झाल्याच्या नावाखाली रोजंदारी वन कामगारांना कामावरुन कमी केले जाते. तेव्हा या वन कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याचे काय, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. १२ महिने कामावर राहणारे वन अधिकारी शासनाचा आदेश आहे, असे निर्लज्जपणे सांगून नवीन कामगारांना घेतात. रोजंदारी कामगारांची बाजू उचलून धरणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यापूर्वी दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार याकडे लक्ष देतील व वन कामगारांना अनाथ कामगाराप्रमाणे नव्हे तर सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देतील, अशी अपेक्षा प्रा. दहिवडे यांनी व्यक्त केली आहे.
वन कामगारांची अवस्था अनाथांसारखी
By admin | Published: May 10, 2017 12:51 AM