चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील एकारा ग्रामपंचायत येथील सामूदायिक वनहक्क दावा, जिल्हा परिषद शाळेची इमारत दुरुस्ती, गुरांच्या दवाखान्याची भिंत, नियमित बसफेऱ्या व आरोग्य उपकेंद्राची भिंत आदी समस्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संबंधित विभागाला दिले. जिल्हाधिकारी यांनी प्रथमच गावात मुक्कामी राहून नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्याने एकारावासी सुखावले.‘एक रात्र गावात मुक्काम’ या उपक्रमांतर्गत डॉ. दीपक म्हैसेकर यांनी एकारा येथे मुक्काम करुन ग्रामस्थांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ, उपवनसंरक्षक ठाकरे, नायब तहसीलदार एस. एम. टिपरे, संवर्ग विकास अधिकारी सानप, गटशिक्षणाधिकारी सेलोकर, पोलीस निरीक्षक नगराळे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी एकारा येथे ग्रामसभा घेऊन नागरिकांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. एकारा येथील ग्रामस्थांना वन्यपशुंचा त्रास सहन करावा लागतो, ही बाब नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. आरोग्य उपकेंद्रातील रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत असून याबाबत कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली. वनविभागामार्फत देण्यात येणारे गॅस कनेक्शन मिळाले नसल्याचेही नागरिकांनी सांगितले.. येथील नागरिकांनी वनहक्क दावे मंजूर करण्याची विनंती या ग्रामसभेत करण्यात आली.एकारा येथे सायंकाळची बसफेरी सुरु करण्याबाबत नागरिकांनी आग्रही मागणी केली. तसेच अनेक दिवसांपासून रिक्त असलेले पोलीस पाटील हे पद तात्काळ भरावे, अशा मागण्या नागरिकांनी या ग्रामसभेत केल्या. यावर बोलतांना जिल्हाधिकारी यांनी एकारा गावाच्या नागरिकांच्या विविध मागण्या रास्त असून त्या तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन ग्रामस्थांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ यांनी महसूल विभागाच्या योजनांची माहिती दिली. जिल्हाधिकारीऱ्यांनी एकारा येथील नागरिकांसोबत संवाद साधून कुठलीही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात थेट संपर्क करण्याचे सूचविले.(शहर प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांचा एकाऱ्यात मुक्काम
By admin | Published: June 19, 2014 12:01 AM