विनायक येसेकर
चंद्रपूर : धानाच्या पिकासाठी करण्यात येणारी पारंपरिक पद्धती बाजूला सारून दीड एकराच्या शेतात हळदी पिकाप्रमाणे वाफे तयार करून त्यात धानाचे बीज रोपण केले. लागणाऱ्या खर्चाची बचत करून दोन ते तीन पट धान्याचे विक्रमी उत्पादन भद्रावती येथील महाराष्ट्र शासन वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी दत्तात्रय गुंडावार यांनी घेतले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध क्षेत्रातील कृषी विषयावर पुरस्कार प्राप्त शेतकरी दत्तात्रय गुंडावार हे शेतीत निरनिराळे प्रयोग करीत असतात. दिवसेंदिवस शेतकऱ्यांना मशागतीसाठी, तसेच रासायनिक खताचा खर्च वाढत चालला आहे. तसेच शेतात मजूर मिळत नाही याकरिता गुंडावार यांनी आपल्या शेतातील दीड एकरात धानाच्या पिकाचा प्रयोग करण्याचे ठरविले.
त्यांनी शेतात गाठे तयार करून हळदी पिकाला ज्या पद्धतीने वाफे तयार केले जाते, त्या पद्धतीने वाफे तयार केले. त्यात २५ सेंटिमीटर अंतरावर चार बीज रोवले व त्याच बिजाचे मोठे रोप तयार होऊन धानाचे दाने तयार झाले. यासाठी त्यांना पाच किलो धानाचा वापर करावा लागला. यासाठी कोणतीही रोवणी केली नाही. चिखल केला नाही. त्यासाठी मजूरसुद्धा लावले नाही. या पद्धतीने लागणारी पारंपरिक पद्धत बाजूला ठेवली. यात मोठ्या प्रमाणात पैशांची बचत करण्यात आली.
वाफ्यात रोवलेल्या चार बिजाला ५० ते १०० उभे पीक तयार झाले व एका पिकाला चारशे ते पाचशे धानाचे दाणे तयार झाले. यासाठी कोणत्याही रासायनिक खत किंवा फवारणी करण्यात आली नाही. या प्रक्रियेमुळे गुंडावार यांना धान्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे.
पाच वर्षे करता येतो धानाचा वापर
धान कापणीनंतर तयार झालेल्या धानाचा सतत पाच वर्षे वापर करता येतो. तसेच धान कापणीनंतर या मुळांना तणनाशक मारल्याने येथील अवशेष मरून जातात व त्यांचे कार्बन तयार होऊन त्याचे सेंद्रिय खतात रूपांतर होते. ते शेतीला उपयुक्त ठरतात. धानाच्या शेतीसाठी लागणारा अवाढव्य खर्च, तसेच मजुरांना लागणाऱ्या खर्चाची बचत झाली. वाफे पद्धतीने धानाच्या शेतीतून विक्रमी उत्पादन झाल्याने येथील कृषी तज्ञ, कृषी अधिकारी, तसेच शेतकरी या प्रक्रियेबाबत प्रक्रिया जाणून घेऊन गुंडावार यांच्याकडून माहिती घेत आहे.