जिल्हा परिषदेची मोहीम : इतर घरांवरही लागणार जरा जपून, फिफ्टी-फिफ्टी, लय भारीचे स्टिकर्सचंद्रपूर : शौचालयाचे बांधकाम करून त्याचा नियमित वापर केला जावा, यासाठी स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून गावागावात जनजागृती केली जात आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या कुटुंबियांना शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जाते, असे असतानाही या अभियानाला अपेक्षित गती मिळत नसल्याने आता शासनाने ज्यांच्याकडे शौचालय बांधकाम झालेले नाही अशा कुटुंबियांच्या घरावर खतरा, धोका असे लिहिलेले लाल रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. तर इतर घरांवर वेगवेगळे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत, जेणेकरून अशी घरे लगेच ओळखता येतील.पूर्वी निर्मल भारत अभियानाच्या माध्यमातून गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. या माध्यमातून अनेक गावामध्ये शौचालयाचे प्रमाण शंभर टक्क्यांवर गेले. आता स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जात आहे. असे असले तरी काही गावांमध्ये शौचालय बांधकामाची मोहीम फारशी गतिमान दिसून येत नाही. ही बाब शासनाने लक्षात घेऊन या अभियानाला गती मिळावी म्हणून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक घरावर वेगवेगळी प्रकारची स्टिकर्स लावली जाणार आहेत.त्याचप्रमाणे ज्या कुटुंबाकडे शौचालय आहे व संबंधीत कुटुंबाकडून त्याचा शंभर टक्के वापर केला जात आहे, अशा घरांवर लय भारी असा मजकुर असलेले स्टिकर्स लावले जाणार आहेत. शासनाच्या सुचनेनुसार ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही, अशा कुटुंबांना तालुका पातळीवरील व जिल्हा पातळीवरील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी गृहभेटी देऊन त्यांना शौचालय बांधकामाबाबत मार्गदर्शन करुन मत परिवर्तन करणार आहेत. ही मोहीम चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गाव कृती आराखड्यामध्ये असलेल्या गावांमध्ये राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शौचालय नसलेल्या घरांवर लागणार स्टिकर्स
By admin | Published: November 26, 2015 12:54 AM