प्रकरण तपासात : खरेदी-विक्रीच्या पावत्याच पोलिसांकडे नाहीतआक्सापूर : राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे. तरीही महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणावर जनावरांची आंतरराज्यीय तस्करी सुरु आहे. हा प्रकार राजरोसपणे सुरु असतानाच लाठी पोलिसांनी २७ जनावरे घेऊन तेलंगणात जाणारे वाहन पोडसा पुलाजवळ पकडले. या कारवाईला १५ दिवसांचा कालावधी झाला असला तरी ही जनावरे चोरीची आहेत, की खरेदीची आहेत, याचा तपास लावण्यात लाठी पोलीस अपयशी ठरले आहेत. यातच अजूनपर्यंत सदर जनावरांच्या खरेदीविक्रीची कागदपत्रे पोलिसांच्या हाती न लागल्याने लाठी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केली जात आहे.४ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास लाठी पोलिसांच्या पथकाने २७ जनावरे घेऊन तेलंगणाकडे जात असलेले वाहन पकडले. या वाहनात गाय, बैल होते. वाहनासह आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनांतील संपूर्ण जनावरांना लाठी पोलीस ठाण्याच्या ताब्यात ठेवण्यात आले. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. २७ जनावरांपैकी तीन जनावरांचे आरोग्य ढासळले असून यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित २४ जनावरांना लाठीच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आरोपींची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे जनावरे खरेदी-विक्रीच्या पावत्या आढळल्या नसल्याची माहिती लाठीचे ठाणेदार चौथनकर यांनी दिली. त्यामुळे ही जनावरे चोरीची असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.विशेष म्हणजे, सदर घटनेला १५ दिवसांचा कालावधी लोटूनही अद्यापही जनावरांच्या खऱ्या मालकांचा पत्ता लावण्यात पोलिसांना यश आले नाही. यासंदर्भात विचारणा केली असता तपास सुरु आहे, यापुढे माहिती देण्यास लाठी पोलीस तयार नाही.आरोपींवर प्राणीसंरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यात लाठी पोलीस अपयशी ठरले आहेत. तेलंगणा महाराष्ट्र सीमेवरुन मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होते. याबाबतचे अनेक प्रकार समोर आले आहेत.पोडसा येथील जनावरांना पकडल्याच्या प्रकारानंतर लाठी पोलिसांना तस्करांची साखळी शोधण्याची मोठी संधी मिळाली होती. मात्र या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मानसिकता लाठी पोलिसांनी दाखविली नाही, असा आरोप परिसरातील शेतकरी करीत आहेत. अशातच गोंडपिपरी तालुक्यातील गावागावातून जनावरे चोरीला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असताना या प्रकरणाकडे गांभीर्याने बघितले जात आहे. (वार्ताहर)
लाठी पोलिसांच्या ताब्यातील जनावरे कुणाची?
By admin | Published: October 22, 2015 12:56 AM