बल्लारपूर : तालुक्यातील मानोरा येथील उपप्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुरु होण्यासाठी मानोरा, इटोली, कवडजईतील ग्रामस्थांना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नुकतीच यासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मानोरा येथील आरोग्य केंद्राची पाहणी केल्यामुळे मानोरावासीयांची आशा बळावली आहे.
चार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली आरोग्य केंद्राची इमारत दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळखात पडून आहे. यामुळे मानोरा व आजूबाजूच्या गावांमधील लोकांना कोरोना काळात आरोग्य तपासणीसाठी दुसरीकडे जावे लागत आहे. बल्लारपूर विधानसभेत समाविष्ट असलेल्या मानोरा गावाची लोकसंख्या दोन हजार ५८० आहे. मानोरा येथे ६० टक्के ओबीसी, २० टक्के अनुसूचित जाती व २० टक्के आदिवासी यांचे वास्तव्य आहे. असे असताना मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय नसल्यामुळे या भागातील इटोली, कवडजईच्या ग्रामस्थांना कोठारी, बल्लारपूर व चंद्रपूर येथे जावे लागते. यामुळे हे केंद्र सुरू करण्याची मागणी मानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते रोशन अली, विजय पिपरे यांनी केली आहे.
कोट
मानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरु करण्यासाठी नियोजन विभागाकडे एक महिन्यापूर्वी निवेदन दिले आहे. अनेकदा पाठपुरावाही केला आहे. कोरोना काळात हे केंद्र सुरु होणे काळाची गरज आहे.
- महादेव देवतळे, अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना, मानोरा.