सरपंचांना निवेदन : तुकडोजी महाराज युवा मंडळाची मागणीबल्लारपूर: बल्लारपूर-चंद्रपूर चौपदरी रस्त्यादरम्यान, टोलनाका सुरू करण्यात आला. यामुळे बल्लारपूर व राजुराकडे जाणारे जडवाहन टोल वाचविण्यासाठी विसापूर गावाच्या हद्दीतून ये-जा करतात. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर जडवाहनांची वाहतूक गावातून बंद करण्यात यावे, अशी मागणी विसापूर येथील संत तुकडोजी महाराज युवा मंडळाने केली आहे. सरपंच रिता जिलटे यांना शुक्रवारी याबाबत निवेदन देण्यात आले.विसापूर फाटा येथे वर्षभरापूर्वी टोल प्लाझा उभारण्यात आला. वाहन-चालक टोलची रक्कम वाचविण्यासाठी विसापूर गावातील मार्गाने ये-जा करतात. यामुळे गावातील रस्त्यांची दुरावस्था होत आहे. कित्येकदा येथील नागरिकांना अपघाताला बळी पडावे लागत आहे. धुळीचा प्रादूर्भाव वाढून प्रदूषणाची समस्या निर्माण होत आहे. यासाठी यापूर्वी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले होते. मात्र जडवाहनांची वाहतूक अद्याप बंद करण्यात आली नाही. तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विसापुरात दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील विसापूर फाट्यावर गतिरोधक तयार करण्यास ग्रामपंचायतीने अद्यापही पाठपुरावा केला नाही. यामुळे गावकऱ्यांत नाराजी आहे.टोल वाचविण्यासाठी वाहनचालक जडवाहनांची वाहतूक विसापूर येथून पॉवर हाऊस मार्ग व बल्लारपूर किल्ला वॉर्ड मार्गाने करीत आहेत. अहोरात्र जडवाहनांच्या अवागमनामुळे रस्ता खराब झाला असून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. बल्लारपूर व चंद्रपूरकडे जाणाऱ्या जडवाहनांची रहदारी विसापूर गावातून कायमची बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. सरपंच रिता जिलटे यांना निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात राजेश गोरे, मिथिलेश हरणे, उमाकांत गिरसावळे, निखील क्षिरसागर, विश्वास गिरसावळे, नितेश गिरडकर, मनोज मारबते, सौरभ गिरसावळे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)
विसापुरातील जडवाहनांची वाहतूक बंद करा
By admin | Published: January 24, 2016 1:01 AM