फोटो लावणे
तळोधी बा.: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबईअंतर्गत नागभीड तालुक्यातील अनेक सेवा सहकारी सोसायटीमधून आधारभूत धान खरेदी केली जाते. मात्र, खरेदी केलेल्या मालाची डिओमार्फत उचल न केल्यामुळे सोसायटीमार्फत काटे करणे बंद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
त्वरित शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी सरपंच सेवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष हेमंत लांजेवार यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने गेल्या दोन वर्षांपासून आधारभूत किमतीसह बोनस जाहीर केल्याने, अनेक शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव असल्याने सोसायटी अंतर्गत धान विक्री करीत होते. मात्र, या वर्षी शेतकऱ्यांना टोकन पद्धतीने नंबर लावायला सांगितल्याने, श्रीमंत शेतकऱ्यांनी बाहेरून धानखरेदी करून अनेक सोसायट्यांमधून धानाची विक्री केली. मात्र, गरीब शेतकरी वर्गाचे तीन महिन्यांपासून धानाचे चुरणे झालेले असताना, शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून नंबर लावून टोकण घेतलेले होते. आतापर्यंत ७४० शेतकऱ्यांना टोकण मिळाले असताना, ३५० शेतकऱ्यांच्या मालाची १२ हजार ६८० क्विंटल धानखरेदी करण्यात आली, परंतु सोसायटीअंतर्गत खरेदी करण्यात आलेले धान्य डिओमार्फत उचल करण्यात येत नसल्याने, पंधरा दिवसांपासून खरेदी बंद आहे. शेतकऱ्यांनी आपले धान्य जागेअभावी अंगणात ठेवले असून, सुकून जात आहे. त्यामुळे एकीकडे गरीब शेतकरी अगोदरच महागाईमुळे भरकटला जात असताना, दुसरीकडे शासन मालाची खरेदी करीत नसल्याने शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडले आहे. त्यामुळे टोकनधारक शेतकऱ्यांचे त्वरित काटे करण्यात यावे, अशी मागणी सरपंच सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष हेमंत लाजेवार यांनी केली आहे.