वकिलांचे निवेदन : इतिहासाचे माहात्म्य जपाचंद्रपूर: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनच्या वतीने दीक्षाभूमीचे व्यापारीकरण थांबविण्यासंबंधी चंद्रपूर येथील ५८ वकिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर १६ आॅक्टोबर १९५६ ला लाखो शोषित व वंचित घटकातील लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हापासून दीक्षाभूमी ही संपूर्ण महाराष्ट्रातील व देशातील बौद्ध बांधवाचे श्रद्धास्थान आहे. दीक्षाभूमीवरील व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी, चंद्रपूरकडे आहे. गेल्या काही वर्षांपासून व्यवस्थापन कमिटीने दीक्षाभूमीची पवित्र जागा क्रॉफ्ट मेलासाठी देऊन दीक्षाभूमीचे व्यापारीकण करणे सुरु केले. त्यावर चंद्रपूर शहरातील बौद्ध समाजाने आपला विरोधसुद्धा दर्शविला होता. परंतु व्यवस्थापन कमिटीने यावर्षीसुद्धा बौद्ध समाजाचा व त्यांच्या भावनेचा कोणताही विचार न करता दीक्षाभूमीची पवित्र जागा क्राफ्ट मेलासाठी देऊन दीक्षाभूमीचे व्यापारीकरण करुन त्याचा फक्त नफा कमविण्याचे साधन म्हणून वापर करीत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातील बौद्ध समाजाच्या भावनेला हरताळ फासला जात आहे. नागपूर शहरानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा देण्याकरिता चंद्रपूर शहराची निवड केली. ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील बौद्ध समाजाकरिता अभिमानाची गोष्ट आहे. सोबतच त्याचे पावित्र्य राखून ठेवण्याची जबाबदारी जितकी बौद्ध समाजाची आहे तितकीच प्रशासनाचीसुद्धा आहे.प्रशासनाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांना चंद्रपूर दीक्षाभूमीवर असलेला क्राफ्ट मेला त्वरित खाली करण्याची समज देण्यात यावी. तसेच क्राफ्ट मेलाच्या प्रशासकालासुद्धा दीक्षाभूमीवरुन क्राफ्ट मेला त्वरित बंद करुन दीक्षाभूमीची जागा मोकळी करुन देण्यात निर्देश देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष अॅड. एन. बी. रामटेके, सचिव अॅड. पूनमचंद वाकडे, कोषाध्यक्ष अॅड. एम. पी. तेलंग, वरिष्ठ अधिवक्ता अॅड. मिलिंद लोहकरे, तसेच अॅड. ज. वि. खोब्रागडे, अॅड. ए. जे. आघात, अॅड. वावरे, अॅड. गायकवाड, अॅड. जिलेकर, अॅड. वैशाली कवाडे, अॅड. कवाडे, अॅड. गोंगले, अॅड. काकडे व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दीक्षाभूमीचे व्यापारीकरण थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2016 12:39 AM