चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शासकीय तसेच खासगी रुग्णालयात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी योग्य नियोजन केले नसल्यामुळे मृतदेहाची अवहेलना होत आहे. एका शववाहिकेतून १० ते १५ जणांचे मृतदेह वाहून नेत असून स्मशानघाटातही गर्दी केली जात आहे.
प्रशासनाने वेळीच दखल घेऊन मृतदेहाची अवहेलना थांबवावी, अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल, असा इशारा चंद्रपूर सोशल अकादमीचे अध्यक्ष प्रदीप खांडरे, सचिव संजय वैद्य यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहांचे ढीग पडल्यागत स्थिती बघायला मिळत आहे. प्रशासनाने खासगी रुग्णालयातील मृतदेह शासकीय रुग्णालयात न आणता तिथेच कागदोपत्राची प्रक्रिया करून तिथूनच थेट स्मशानघाटात नेण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून धान्याचे पोते ठेवतात तसे मृतदेह ठेवले जात असल्याचेही निवेदनातून प्रशासनाला कळविण्यात आले आहे.