चंद्रपूर : बल्लारपूर अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात मायनिंग शाखेमधील विद्यार्थ्यांकडून फ्लेम सेफ्टी लॅम्प हांडलींग प्रमाणपत्राच्या नावे पैसे उकडण्यात येत असल्याने मनसेच्या शिष्टमंडळाने प्राचार्यांची भेट घेऊन ही आर्थिक लूट थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला.
फ्लेम सेफ्टी लॅम्प हांडलींग प्रमाणपत्र नमुना डीजीएमएसच्या साईटवर निशुल्क उपलब्ध आहे. मात्र तरीसुद्धा या प्रमाणपत्राच्या नावाने विद्यार्थ्यांकडून हजार-हजार रुपये वसूल करण्यात येत आहे. तसेच त्याबाबत कुठलीही पावती दिल्या जात नसल्याचा आरोप करीत मनसेच्या शिष्ठमंडळाने बुधवारी तंत्रनिकेतन व अभियांत्रिकीच्या प्राचार्यांची भेट घेऊन ही बाब लक्षात आणून दिली. कोरोनामुळे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे हा गैरप्रकार थांबवावा, शुल्क माफ करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. विद्यार्थी वर्गाला परवडेल अशी शुल्क आकारणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर निवेदन ग्रा. पं. सदस्य तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष विवेक धोटे यांच्या नेतृत्वात व जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, शहर अध्यक्ष नितीन पेंदाम, शहर उपाध्यक्ष सुयोग धनवलकर, ग्रा. प. सदस्य नितीन टेकाम, तालुका उपाध्यक्ष मयूर मदनकर, तालुका उपाध्यक्ष करण नायर, अक्षय चौधरी आदी उपस्थित होते.