आढावा बैठकीत पोलिसांना सुनावले : अशोक नेते यांचा अधिकाऱ्यांना इशाराब्रह्मपुरी : तहसील कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी खासदार अशोक नेते यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत पोलीस विभागाला चांगलेच धारेवर धरले. तालुक्यातील अवैध दारूविक्री व जोमाने सुरू असलेली सट्टापट्टी ताबडतोब बंद करा अन्यथा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी आढावा बैठकीत पोलिसांना दिला. ब्रह्मपुरी तालुक्यात अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. अधिकाऱ्यांच्या मनमानीपणामुळे नागरिकांना विकासापासून दूर ठेवले जात आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खासदार अशोक नेते यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले. होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तालुक्यात अनेक गावांमध्ये मनरेगा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आहे. काही गावांत तो उघडकीस आला, तर काही गावे यादीमध्ये समाविष्ठ आहेत. अशा साऱ्या प्रकरणावर संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी समिती स्थापन करून येत्या १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश खा.अशोक नेते यांनी यावेळी दिले. आढावा बैठकीत कृषी विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, वनविभाग, वीज वितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, महसूल विभाग, गोसीखुर्द विभाग आदी व अन्य विभागाशी असलेल्या प्रश्नावर खुली चर्चा करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात सर्रास अवैध दारू विक्री व जोमाने चाललेल्या सट्टापट्टी व्यवसायावर खासदार अशोक नेते यांनी खरपूस समाचार घेतला. चिल्लर दारू विक्री करणारे पकडून गुन्ह्यांची संख्या वाढवून नका, तर या व्यवसायात गुंतलेल्या मोठ्या तस्करांना कधी पकडणार आहात, ते अगोदर सांगा, असेही खडे बोल त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले. वॉर्डावॉर्डात पानटपरीवर मोठ्या जोमाने सट्टापट्टी व्यवसाय सुरू आहे. शाळेचे विद्यार्थी सट्टयाच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. हे सर्व अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे सांगून तालुक्यातील संपूर्ण अवैध धंदे बंद करा अन्यथा पोलिसांना स्वत:च कारवाईला समोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले. आढावा बैठकीत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार प्रा. अतुल देशकर, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, नगराध्यक्षा रिता उराडे, तहसलिदार अनिल शिवरकर, दीपक उराडे, परेश शहादाणी, भारतीय जनता पार्टीेचे पदाधिकारी, ग्रामीण भागातील आजी-माजी पदाधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अवैध दारूविक्री व सट्टापट्टी बंद करा अन्यथा कारवाई
By admin | Published: October 24, 2015 12:36 AM