गोवरी : राजुरा शहरापासून जवळच असलेल्या जोगापूर जंगलात वन विभागाने सुरू केलेली जंगल सफारी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी आहे. या जंगल सफारीमुळे भविष्यात वन्यप्राणी डुक्कर, हरीण, चितळ, सांबर, जंगलाबाहेर येऊन शेतकऱ्याचे शेतपीक नष्ट करणार आहेत. त्यामुळे जोगापूर वनपर्यटन तत्काळ बंद करा, अशी मागणी किसान क्रांती समन्वय समितीने केली आहे.
शेतकरी अनेक संकटांचा सामना करीत आहेत. वाघ, बिबट, अस्वलही जंगलाबाहेर येणार आहेत. त्यामुळे वन्यजीव व मानव संघर्ष निर्माण होऊन जैव विविधता धोक्यात येईल. याला जबाबदार फक्त आणि फक्त वनविभाग असणार आहे. शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे. जंगलातून वन्याप्राणी शेतामध्ये येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. परिसरातील कुठल्याही नागरिकांची, शेतकऱ्यांची मागणी नसताना हे वनपर्यटन का सुरू करण्यात आले, असा प्रश्न समितीने केला आहे. ज्या गोष्टीला शेतकरी विरोध करीत आहेत, तीच गोष्ट करण्यात वनविभाग असा हट्ट का करीत आहे, वनपर्यटन बंद न केल्यास वनालगतच्या गावातील शेतकरी, शेतमजुरांचा संताप उफाळून रस्त्यावर येईल. त्यामुळे जोगपूर जंगलातील जंगल सफारी तत्काळ बंद करावी, अशी मागणी किसान क्रांती समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बोबडे यांनी केली आहे.