रोजच्या जेवणात आपण बऱ्याच पदार्थांचे सेवन करतो. त्यातून कोणती पोषकतत्त्वे मिळतात आणि कोणते पदार्थ शरीराला हानिकारक असतात, याची नेमकी माहिती नसते. कोरोना असूनही बाहेर जेवायला जायचे म्हटले की सगळे एका पायावर तयार होतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून या बाहेरच्या पदार्थांमध्ये तिखट, मसालेदार व चायनीजचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात तिखट पदार्थांचे प्रमाणही जास्त असल्याने अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे, अशी माहिती चंद्रपूरचे आयुर्वेदिक डॉ. श्रीकांत जोशी यांनी दिली. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वापरला जाणारा अजिनोमोटो पचनसंस्थेसह शरीराचे इतरही नुकसान करू शकतो, याकडे डॉ. खिरेंद्र गेडाम यांनी लक्ष वेधले.
काय आहेत लक्षणे
पोट दुखणे
उलट्या होणे
भूक मंदावणे
वजनात अचानक घट होणे
मळमळ वाटणे
खाज सुटणे
तोंडाला पोड येणे
काय काळजी घेणार?
अद्रक, तुळस, काळीमिरी हे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. याचसोबत मसालेदार पदार्थांमुळे अल्सर होऊ शकत नाही; परंतु इरिटिट बोवेल सिंड्रोम, डिस्पेपसिया किंवा दाहक आतड्यांचा रोग (आयबीडी) असल्यास सावधगिरी बाळगायला हवी. मसालेदार पदार्थांमुळे पोटदुखी देत असेल तर खाण्यापूर्वीच आपण विचार करावा. कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन करताना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉ. मंगेश रोहणकर यांनी दिला.
पौष्टिक आहार हाच महत्त्वाचा
कोरोनामुळे अनेकांच्या घरातील दैनंदिन आहारात बदल झाला. ही जीवनशैली नेहमीकरिता स्वीकारणे अत्यावश्यक झाले आहे. १०० टक्के निर्बंध उठविल्यानंतर बाहेरचे चटपटीत व मसालेदार अन्न सेवन केल्यास त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
- प्रा. प्रांजली सायंकार, आहारतज्ज्ञ, दादमहल वॉर्ड, चंद्रपूर
सर्वच वयोगटांतील व्यक्तींनी संतुलित आहार घेतला पाहिजे. ज्यातून शरीराच्या पोषणाची गरज भागेल. आहारात कडधान्ये, भाज्या आणि फळांचा समावेश केल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही. काहींना हे परवडणार नाही. मात्र, कोरोनाकाळात तरी सकस आहाराशिवाय पर्याय नाही.
-डॉ. भूपेश लाड, चंद्रपूर