गोंडपिपरी : तालुक्यांतील करंजी गावाला तंटामुक्त गाव मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कार प्राप्त झाला. मात्र, दारूबंदीनंतरच्या काळात गावात सद्य:स्थितीत अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. यासह करंजी-चेकपेल्लूर रस्त्यावर चंद्रपूर येथील एका बड्या दारूविक्रेत्याने आपले दुकान थाटले आहे. बिनदिक्कतपणे दारूविक्री सुरू केली आहे. ही दारूविक्री समूळ बंद करावी, अशी मागणी गावातील काही नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली.
या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनही देण्यात आले आहे. दारूबंदी काळापासूनच जिल्हा सीमेवरील गोंडपिपरी तालुक्यात प्रचंड प्रमाणात तस्करीतून दारू आयात केली जाते. अशातच तालुक्यातील करंजी गावात, तसेच करंजी-चेक पेलूर या मार्गावर एका अवैध दारू विक्रेत्याने ठाण मांडले असून, खुलेआम दारू विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. असे असताना या दारूविक्रीवर कुणाचेच अंकुश नसल्याचे चित्र आहे. सोबतच करंजीच्या परिसरात गावात कोंबडबाजार, जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे गावातील शांतता, सुव्यवस्था धोक्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी करंजी गावातील महिलांनी एकत्र येत दारूविक्री सुरू असतांना गावातील वैध दारूचे दुकान बंद पाडले. यामुळे महिला शक्तीचा विजय झाला अन् करंजी गावात शांतता आणि सुव्यवस्था नांदू लागली. याउलट आता मात्र दारूबंदीच्या काळात करंजी गावासह परिसरातील गावात दारूविक्रीला सुगीचे दिवस आले आहेत. ही दारूविक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी करंजी गावासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.