काँग्रेसचे आंदोलन : कामगारांच्या विविध मागण्या लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : जीएमआर कंपनीमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यासंदर्भात मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. परंतु व्यवस्थापनाने त्याची दखल घेतली नाही. परिणामी संतापलेल्या कामगारांसह काँग्रेसने कंपनीसमोर जोरदार आंदोलन करून सोमवारी कंपनीचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला.वीज निर्मिती करणाऱ्या जीएमआर कंपनीमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांत ३० दिवस काम दिले जात नाही. तसेच या कामगारांना कॅन्टीन व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येत नाहीत. कंत्राटी कामगार प्रशिक्षित असूनही अप्रशिक्षित दर्जाचे काम देवून तुटपुंजे वेतन दिले जात असल्याचा आरोप करीत कामगारांनी आंदोलन पुकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते डॉ. विजय देवतळे, जि.प. सदस्या आसावरी देवतळे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांच्या नेतृत्वात कामगार आंदोलन करीत आहे.आंदोलनकर्त्या कामगारांनी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, उपविभागीय अधिकारी व जीएमआर कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. परंतु तोडगा निघाला नाही. या कालावधीत आंदोलनात सहभागी कामगारांना कंपनीतून कमी करण्यात येत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. जीएमआर कंपनी प्रवेशद्वारासमोर १२ जून रोजी सकाळी मोठ्या प्रमाणात कामगार गोळा झाले. यावेळी त्यांनी कंपनीत जाणाऱ्या कामगारांची वाहने अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावर पोलिसांनी हस्तक्षेप करीत कामगारांची वाहने आत सोडली. कामगारांसोबत काँग्रेसचे मनोहर स्वामी, शिरोमणी स्वामी, माजी नगराध्यक्ष मेघश्याम सिडाम, प्रवीण भोयर, माजी नगरसेवक सोमदेव कोहाड, राजू जाजुर्ले, अरुण फुंदे, संदीप दीडमिशे, सुरेश सोरते आदी सहभागी झाले.कंत्राटी कामगारांना आठ रुपये चहा कंत्राटी कामगार कंपनीमध्ये काम करीत असताना कंपनीच्या कॅन्टीनमध्ये त्यांना आठ रुपये प्रति चहा घ्यावा लागतो. ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर चहाचा दर कमी करण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु कॅन्टीनमध्ये दरामध्ये बदल करण्यात आला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन -विजय देवतळेकामगारांना ३० दिवस काम, आठवड्यातून एक दिवस रजा, आरोग्याच्या व कॅन्टीनची सुविधा मिळावी. ज्या कामगारांना कपात करण्यात आले, त्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी शांततेने आंदोलन सुरू आहे. त्याकरिता प्रशासनाला सहकार्य करीत आहोत. परंतु आंदोलन दडपण्याचे काम करण्यात येऊ नये. मागण्या मंजूर होईस्तोवर आंदोलन सुरू राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.आजच्या आंदोलनाची कोणतीही सूचना कंपनीला मिळाली नाही. आंदोलनाचा नेमका काय उद्देश आहे, हे कळत नाही. कामगारांच्या खात्यात पीएफ जमा होत असल्याने कामगारांनी शंका घेण्याचे काहीच कारण नाही. कामगारांनी शिस्त पाळलीच पाहिजे.- विनोद पुसदकर, अधिकारी, जीएमआर कंपनी.
जीएमआरचे काम बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 12:26 AM