लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वैनगंगेच्या काठावर असलेल्या लाडस गावाला गुरुवारी सायंकाळी वादळाचा जबर तडाखा बसला. चार घरांचे छप्पर उडाले तर २९ घरांचे अंशत: नुकसान झाल्याने संपूर्ण गाव पुन्हा एकदा हादरले आहे.लाडज हे गाव ब्रह्मपुरीच्या ईशान्येस १० किमी अंतरावर आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे जणू बेट असल्याचे दिसून येते. गावाला चारही बाजूने वैनगंगा नदीने वेढले आहे. पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो. गुरुवारी सायंकाळी अचानक वादळाने तडाखा दिल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. कैलास श्रवण मोहुर्ले, कैलास देवराव अलोने, चक्रधर श्रवण मोहुर्ले, भास्कर हरबा राऊत यांच्या घराचे छप्पर उडाल्याने ते सद्या जि.प. शाळेच्या खोल्यांमध्ये कुटुंबासह आश्रय घेतला आहे. या वादळात २९ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. मोठी झाडे उन्मळून पडली.वादळाचा तडाखा बसल्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. शासनाने तातडीने भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जि.प. गटनेते सतीश वारजूकर, जि.प. सदस्य स्मिता पारधी, तहसीलदार विद्यासागर चौहान, मंडळ अधिकारी शरद तुपट, तलाठी किशोर सापटे, वितेश्वर येरमा, हेमराज डांगे आदींनी गावाला भेट देवून आपदग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या.संकटाची टांगती तलवारलाडज गावावर पावसाळ्यात संकटाची टांगती तलवार असते. दरवर्षी पावसाळ्यात वैनगंगा नदीला पूर आल्याने तालुक्याशी संपर्क तुटतो. मागील वर्षी पूर आल्याने डोंग्याचा वापर करावा लागला. दरम्यान, डोंगा उलटल्याने दोघे वाहून गेल्याची घटना घडली होती. गावाच्या संपर्कासाठी पूलाची गरज आहे. पण, जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.वादळाचा तडाखा बसलेल्या चार विस्थापित कुटुंबाना सानुग्राह्य अनुदान तातडीने देण्यात येईल. नियमाप्रमाणे मुल्यांकन करण्याचे काम सुरू आहे. मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही.-विद्यासागर चव्हाण, तहसीलदार ब्रह्मपुरी
लाडज येथे वादळाचा कहर ३३ घरांना बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:14 PM