शासकीय कार्यालयात कचऱ्याचे ढीग
चंद्रपूर : येथील प्रशासकीय इमारती परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे. महत्त्वाच्या फायली जीर्ण झाल्याने एकत्र ढीग करून ठेवण्यात आले आहे. या कचऱ्यायाची विल्हेवाट लावण्याची मागणी केली जात आहे.
प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था कायम
चंद्रपूर : गडचिरोली मार्गावरील अनेक बसथांब्यावर असलेल्या प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी निवाऱ्यांचे छत तुटले आहेत तर अनेकांच्या भिंती पडल्या आहेत.
रेती घाटांच्या लिलावाची प्रतीक्षा
चंद्रपूर : जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव न झाल्याने बांधकामे रखडली आहे. अनेक रेती घाटावरून चोरट्या मार्गाने रेती वाहतूक केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाचा महसूल बुडत आहे.
नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील नाल्यांची स्वच्छता नियमित केली जात नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाल्याची नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.
बेरोजगारांच्या हाताला काम द्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील उद्योगांतर्फे स्थानिक युवकांवर करण्यात येणारा अन्याय दूर करून रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंद केलेल्या जिल्ह्यातील स्थानिक युवकांना पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बेरोजगारांनी केली आहे.
फॅन्सी नंबरप्लेटकडे दुर्लक्ष
चंद्रपूर : दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांवर फॅन्सी नंबरप्लेट लाऊन वाहनचालक सर्रासपणे वाहन रस्त्यावरुन चालवितात, मात्र या वाहनांवर कारवाई करण्यास संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
एसटी बसेस खिळखिळ्या
चंद्रपूर : एसटी महामंडळाच्या काही भंगार बसेसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे नवीन बसची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
सोयी उपलब्ध करून द्याव्या
चंद्रपूर : कोरपना व गडचांदूर येथे मार्केट यार्डमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने धान्य विक्री तसेच जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतात. मात्र या ठिकाणी शेतकरी व जनावरांची प्रचंड गैरसोय होत आहे.
आरोग्य केंद्रांमध्ये असुविधा
चंद्रपूर :जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णांना जिल्हा सामान्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तसेच खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा लागत आहे. यात आर्थिक ताण पडत आहे. आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
वन्य प्राण्यांच्या दहशतीत सरपणासाठी धावफळ
चंद्रपूर : गॅस सिलिंडर आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने व रॉकेल देणे बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश गरीब महिला स्वयंपाकासाठी सरपणाचा वापर करतात. वन्यप्राण्यांच्या दहशतीत महिला जंगल व शेतालगत फिरावे लागत आहे.