स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
गडचांदूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंद असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे.
मत्स्य व्यवसायिकांचे अर्थसहाय्य अडले
वरोरा : जिल्ह्यातील विविध तालुक्यात कार्यरत मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सभासद मालगुजारी तलावात मत्स्यपालन करतात. मात्र, योजनेचे अर्थसहाय्य अद्याप मिळाले नाही. संबंधित विभागाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी मत्स्यपालन संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
व्यायाम शाळा उभारण्याची मागणी
सिंदेवाही : तालुक्यातील काही गावात व्यायाम शाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायमशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. सिंदेवाही तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र अजूनही काही गावांत व्यायाम शाळा नाही. यावर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहे. मात्र भविष्यात गावातील युवकांना व्यायाम करण्यासाठी सोपे होईल.
पडोली चौकातील अतिक्रमण हटवा
पडोली : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. सध्या संचारबंदी असल्यामुळे सदर चौकामध्ये गर्दी कमी आहे. असे असले तरी अन्य वेळी हा चौक सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या चौकातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
पांदण रस्त्यांवर अतिक्रमण वाढले
ब्रह्मपुरी : तालुक्यातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते व गावाची शिव आता संकटात आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून त्याठिकाणी पक्के रस्ते तयार करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोंडवाड्यातील जनावरे असुरक्षित
नागभीड : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहे. मात्र सध्या या कोंडवाड्याची दुरवस्था झाली आहे. कोंडवाड्यामध्ये चारा आणि जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे अत्यावश्यक आहे. मात्र ती करण्यात येत नसल्याचे ते जनावरे असुरक्षित आहे.
कुत्र्यांच्या हैदोसाने नागरिक त्रस्त
सिंदेवाही : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना हे मोकाट कुत्रे अचानक गाडीवर झेप घेतात. यामुळे अपघातही वाढले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
दुर्गापूर मार्गावर गतिरोधकाची मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर ते दुर्गापूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. सकाळी व सायंकाळी या मार्गावर विद्यार्थ्यांची गर्दी असते. संभाव्य धोका टाळण्यासाठी गतिरोधक निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी केली.
आठवडी बाजारात सुविधांचा अभाव
चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आठवडा बाजार भरतो. या बाजाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असली तरी बहुतांश बाजारामध्ये सोयीसुविधा नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो.
इमारतींची दुरुस्ती करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील शासकीय जुन्या इमारतींची दुरुस्ती करून त्याची देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदनही दिले आहे. काही इमारती अतिशय जुन्या झाल्या असतानाही यातूनच शासकीय कारभार हाकला जात आहे.
धुराचे साम्राज्याने आरोग्य धोक्यात
राजुरा : राजुरा तालुक्यातील वेकोलि परिसरात धुरीचे साम्राज्य आहे. सास्ती, गोवारी, पवनी परिसरात रस्त्यावर पाणी न मारल्यामुळे नागरिक आणि वेकोलि कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेकोलि परिसरात चालत्या गाडीमध्ये कोळसा जळत आहे. सुरक्षितताचा गंभीर प्रश्नः निर्माण झाला आहे. वेकोलिच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रिय कार्यप्रणालीमूळे कर्मचारीचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रस्त्यावरील रेतीमुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यावर रेती साचली असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. वाहने स्लिप होऊन अपघात होत आहे.
उघड्यावर अन्नपदार्थ विक्री थांबवावी
चंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थाचा विक्री केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी काही ठिकाणी अन्नपदार्थाची उघड्यावर विक्री केली जात आहे.
लोककलाकारांना हवी आर्थिक मदत
चंद्रपूर : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर आर्थिक परिणाम झाला. यात लोककलाकारांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी कलाकारांनी केली आहे.
कोरोनामुळे लोककलाकारांचे सुगम संगीत, आर्केस्ट्रा, ढोलताशा वादन आदी मनोरंजनाचे कार्यक्रम बंद आहे. त्यामुळे त्या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.
वीज खांबांना लागले रिप्लेक्टर
चंद्रपूर : बाबूपेठ परिसरातील रस्त्यावर नवीन वीज खांब उभारण्यात आले आहेत. पाण्यामुळे खांब गंजू नये, यासाठी जमिनीपासून दहा फुट उंचीपर्यंत पांढºया रंगाचे प्लॉस्टिक रिप्लेक्टर लावण्यात आले. त्यामुळे खांब गंजण्याचा धोका राहणार नाही, अशी माहिती महावितरणने दिली.