नागभीड : शहरातील काही अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली आहे. पाऊस पडला की, या रस्त्यांची पोलखोल होते. ही पोलखोल थांबविण्यासाठी या रस्त्यांना मुरूमाचा मुलामा देण्याचे काम नगर परिषदेने सुरू केले आहे.
वास्तविक नागभीडच्या अंतर्गत रस्त्यांचे काम चार वर्षांपूर्वीच मंजूर झाले. काही रस्त्यांचे कामही सुरू करण्यात आले. मात्र, आश्चर्याची बाब अशी की, या रस्त्यांची कामे आजही पूर्ण होऊ शकली नाहीत. या बाबीस कंत्राटदार, या कंत्राटदारावर नियंत्रण असलेला नागभीडचा सार्वजनिक बांधकाम विभाग की, या यंत्रणेकडून काम करवून घेणारी नागभीडची नगर परिषद यापैकी नेमके जबाबदार कोण याचे कोडे आजही अनेकांना पडले आहे. चार वर्षांपासून या रस्त्यांचे काम सुरू असले तरी आजही काही रस्ते अपूर्णच आहेत. या दिरंगाईबद्दल ना कंत्राटदारावर कारवाई होत, ना सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारणा होत. मात्र, या वेळकाढूपणात सामान्य नागभीडकरांना अकारण त्रास सहन करावा लागत आहे.
आता पावसाळ्यास सुरुवात झाल्याने अगदी छोटासा पाऊस झाला तरी पावसाचे पाणी रस्त्यांवर साचून ठिकठिकाणी डबकी तयार होत आहेत. या डबक्यांमधून वाहन गेले की, उडणाऱ्या पाण्याच्या चिरकांड्यांनी अनेकांचे कपडे खराब होत आहेत. एवढेच नाही तर काहींची वाहने या डबक्यांमध्ये स्लीप झाल्याची माहिती आहे. म्हणूनच या डबक्यांना बुजविण्यासाठी नगर परिषदेने मुरूमाचा मुलामा देण्याचे काम सुरू केले आहे. मंगळवारी विठ्ठल मंदिर परिसरातील रस्त्यांना मुरूमाचा मुलामा देण्यात आला.