लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे मागील चार महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत. या कामगारांना केवळ सहा हजार रुपये एवढे वेतन मिळते. त्यातही चार महिन्यांपासून पगार नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुलांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असतानाही शासनाला मात्र कंत्राटी कामगारांचे पगार देण्यासाठी जाग आलेली नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ थकित वेतन द्यावे, या मागणीसाठी रुग्णालयातील ४०० कामगारांनी शनिवारपासून बेमुदत संप पुकारला व धरणे दिले. ६ फेब्रुवारी रोजी याच मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शनिवारपासून कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. यावेळी जन विकासचे पप्पु देशमुख, सतीश खोब्रागडे व शेकडो कामगार उपस्थित होते.बैठकीतील चर्चाही निष्फळजिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात २७ फेब्रुवारीला संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे पदाधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्रे, उपनिवासी जिल्हाधिकारी भूगावकर, सहाय्यक कामगार आयुक्त लोया उपस्थित होते. मात्र या बैठकीमध्ये थकित पगारावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
रुग्णालयातील ४०० कामगार संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 10:28 PM