लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गीताचार्य तुकारामदादा यांची कर्मभूमी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अड्याळ टेकडी येथील आत्मानुसंधान केंद्रात १० विद्यार्थी ग्रामोन्नतीचे धडे घेत आहेत.गीताचार्य तुकारामदादांनी आत्मानुसंधान केंद्रात आपल्या हयातीमध्ये हा अभ्यासक्रम सुरू केला होता. दरम्यान, निर्वाण झाल्यानंतर अभ्यासक्रम बंद पडले. एक वर्षापासून सदर अभ्यासक्रम सुरू आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यांचे १० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेले शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. या अभ्यासक्रमात शेती, गोरक्षण, तेलघाणी, हातमाग, आयुर्वेद, स्क्रीन प्रिंटींग, इलेक्ट्रिक, बांधकाम, वेल्डिंग, ग्रॅडिंग, शिवनकाम, ड्रायव्हिंग आदी कौशल्य प्रात्यक्षिकाद्वारे शिकविली जातात. विद्यार्थ्यांचे प्रचलित शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये, याचाही कटाक्षाने विचार करण्यात आला आहे. प्रचलित शिक्षण पद्धतीचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विषय शिकविला जातो. त्यानंतर हे विद्यार्थी परीक्षा देतात. अनिल गुडधे व अनिरूद्ध गुरूनुले हे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा विचार आचरणातून शिकविण्याचे कार्य सुरू आहे.
उत्तम संस्कार, स्वावलंबन आणि शिस्तबद्ध जीवन जगण्यासाठी या शिक्षणाचा माझ्या जीवनात उपयोगी होणार आहे.-विशाल तुकाराम पोहिनकरइयत्ता सातवी,अर्जुनी (कोकेवाडा) वरोरा