हरिश्चंद्र पाल - तळोधी(बा.)जिल्ह्यात एकमेव असलेल्या तळोधी बा. येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळतात की, नाही याकडे लक्ष ठेवणारी शाळा व्यवस्थापन समितीही कागदोपत्रीच असून यासंदर्भात बैठकच घेतली नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.शाळेचे व्यवस्थापन करताना विद्यार्थी- पालक शालेय कर्मचारी तसेच व्यवस्थापक यांच्यात समन्वय रहावा, प्रत्येक शाळेत शिक्षक- पालक समिती स्थापन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी शैक्षणिक, सामाजिक व शारीरिक समस्या तसेच विद्यार्थ्यांच्या गरजा, पालकांच्या माध्यमातून शालेय व्यवस्थापनापर्यंत पोहोचवून त्यातून मार्ग काढणे व विद्यालयातील समस्या दूर करण्यासाठी शालेय समिती कार्यरत असते. मात्र समितीच स्थापन केली नसल्याने येथे समस्या वाढत आहे. प्रसंगी प्रशासनाचीही काही आर्थिक सामाजिक अडचण असेल तर पालकांच्या मदतीने अडचण दूर करणे याकरिताच शिक्षक पालक संघ स्थापन करणे गरजेचे असते. मागील वर्षी प्रारंभी पूर्णवेळ प्राचार्यांची जागा रिक्त असल्यामुळे उपप्राचार्यांनी शाळेत शिक्षक - पालक संघाची स्थापनाच केली नाही. शिक्षक- पालकांची बैठकच प्रत्यक्षात घेतली नसल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी वर्षाच्या दुसऱ्या सत्राचे शेवटी जानेवारी- फेब्रुवारी २०१४ मध्ये नवीन शिक्षक- पालक संघाची स्थापना करण्यात आली. परंतु पालक सदस्यांना बैठकीना बोलाविलेच नसल्याचे माहिती मिळाली आहे. परिणामी येथील समस्या पालक तसेच व्यवस्थापनाला कळल्याच नाही. पालकांकडून दरवर्षी जबरदस्तीने वसून करण्यात आलेला प्रत्येकी २०० रुपये शालेय फंडाची रक्कम किती जमा झाली व त्याचा कुठे विनियोग शालेय व्यवस्थापनाने केला. याविषयी शिक्षक-पालक सदस्यांमध्ये एकमत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक संघातील सदस्यांना जाब विचारु लागले आणि तेथूनच अनेक समस्या उजेडात येवू लागल्या.विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण हे निकृष्ठ दर्जाचे असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विद्यालयातील ढसाळ व्यवस्थापनामुळे शालेय परिसरात पाण्याची कृतिम टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी दोन- दोन दिवस आंघोळ करीत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. पुरेशा पाण्याअभावी विद्यालयातील वसतिगृहातील प्रसाधनगृहात अस्वच्छता असून सर्वत्र दुर्गंधी आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे तेल, साबण, टुथपेस्ट, वह्या, जोडे हे वेळेवर दिले जात नाही. पिण्याकरिता वापरात असलेले पाणी अशुद्ध आहे. त्यामध्ये फ्लोराईड, मॅग्नीज असे आरोग्याला अपायकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी होत नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या शरीरातील हिमोग्लोबीनच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. शालेय परिसरात आढलेल्या केरकचरा विद्यार्थ्यांच्या हातानेच काढला जातो. प्रसाधनगृह साफसफाई विद्यार्थ्यांकडूनच करुन घेतली जात असल्याची माहिती मिळाली आहे. मागील एक वर्षापासून विद्यार्थ्यांना देण्यात येणारी फळफळावळे, अंडी, दुध, बिस्कीट पूर्णत: बंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना जेवणात देण्यात येणाऱ्या पोळ्या निकृष्ठ दर्जाच्या गव्हापासून बनविल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे कोणतीही तक्रार करु नये म्हणून त्यांना दडपणात ठेवले जातात. पालकांना विद्यार्थ्यांना भेटण्याकरिता दुसऱ्या व चौथ्या रविवारला परवानगी देण्यात येते. परंतु नेमके त्याच दिवशी प्राचार्य गैरजहर असतात. त्यामुळे पालकांना आपल्या तक्रारी उपप्राचार्य किंवा इतर कर्मचाऱ्यांकडे सांगाव्या लागते. जवाहर नवोदय विद्यालयातील प्राचार्य (व्यवस्थापक) व पालक यांच्यात समन्वय नसल्याने दिवसेंदिवस समस्या वाढत आहे.
विद्यार्थ्यांना करावा लागतो अनेक समस्यांचा सामना
By admin | Published: July 21, 2014 12:06 AM