रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात : चार आदिवासी प्रकल्पांचा समावेशराजकुमार चुनारकर चिमूरशासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत आदिवासी विभागातील कंत्राटदारामार्फत शैक्षणिक साहित्यासह इतर साहित्याचा पुरवठा केला जात होता. यामध्ये अनेक साहित्य दर्जाहीन असायचे. तर अनेक साहित्य विद्यार्थ्यांना आवडत नव्हते. मात्र नाईलाजाने आदिवासी विद्यार्थी ते साहित्य वापरत होते. साहित्याचा दर्जा व विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेवून शासनाने आता कंत्राटदारामार्फत शैक्षणिक साहित्य न देता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर दोन टप्प्यात रक्कम टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी आता आपल्या आवडीने शैक्षणिक साहित्याची खरेदी करणार आहेत.मानवाच्या प्रगतीमध्ये शिक्षणाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. शिक्षणामुळे समाजाची व देशाची प्रगती होण्यास मदत होते. त्यामुळे गावखेड्यातील आदिवासी विद्यार्थी शिकला पाहिजे म्हणून जंगली भागात आदिवासी विभागामार्फत आश्रमशाळाची निर्मिती करण्यात आली व या शाळांमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्या जात आहे. मात्र विभागातील काही महाभागाच्या नियतीमुळे गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या लाभापासून व चांगल्या दर्जापासून वंचित राहावे लागत होते. तर विद्यार्थ्यांच्या न आवडीच्या वस्तुमुळे विद्यार्थी नाईलाजाने सहन करीत होते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर पडत होता. या सर्व बाबीचा विचार करून शासनाने आता आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शैक्षणिक साहित्य, त्याच्या आवडीने खरेदी करण्याची मुबा या नविन निर्णयाने दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छता प्रसाधनापासून शालेय साहित्य, लेखन सामुग्री, गणवेश, अंथरून यासह २८ वस्तू स्वत: खरेदी करता येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे. या अनुदानासाठी आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश राहणार आहे. विद्यार्थ्यांना अनुदानासाठी आधारकार्डशी संलग्न केलेले बँक खाते असणे गरजेचे आहे. दहा वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी पालक व विद्यार्थ्याचे संयुक्त खाते गरजेचे आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांच्या संयुक्त खात्यात थेट लाभ हस्तांतरण योजनेद्वारे आधार बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. हे अनुदान विद्यार्थी दिलेल्या खात्यामध्ये इयत्तेनिहाय विद्यार्थ्याच्या खात्यात पूर्ण वर्षाचे अनुदान शैक्षणिक वर्षे सुरू होण्यापुर्वी जमा करण्यात येणार आहे.लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह इतर साहित्याची रक्कम इयत्तेनुसार विद्यार्थ्यांच्या खात्यात शैक्षणिक सत्र सुरू होण्यापुर्वी देण्यात येणार आहे. ही योजना राज्यातील चार प्रकल्पामध्ये राबविण्यात येत आहे. नागपूर विभागातील चिमूर प्रकल्पाचा समावेश आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या आवडीसह साहित्याचा दर्जा चांगला राहण्यास मदत होणार आहे. या योजनेस यशस्वी करण्यासाठी संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी युद्धस्तरावर काम करीत आहेत.- सुदर्शन नगरे, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर.
आश्रमशाळेतील विद्यार्थीच करणार आता साहित्याची खरेदी
By admin | Published: April 21, 2017 12:56 AM