चंद्रपूर : विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी मनात बाळगून आत्मविश्वासाने येणाऱ्या पुरवणी परीक्षेला सामोरे जावे. परीक्षेतील अपयशाची कारणे शोधून शिक्षकांच्या मदतीने परीक्षेचे पॅटर्न समजून घ्यावे, बेभान होऊन शिक्षणाकडे लक्ष द्यावे व शिक्षण अविरतपणे सुरू ठेवावे, एमपीएससी व यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचे ध्येय समोर ठेवून अभ्यास करावा, विद्यार्थ्यांनी मोबाइलचा अतिवापर टाळण्याचा सल्ला माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दि एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे दहावी व बारावीतील बोर्ड परीक्षेत किमान क्षमता प्राप्त करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी प्राचार्या संगीता बैद, प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक श्रीकांत झाडे, ज्येष्ठ शिक्षिका ज्योत्स्ना नरड, आदर्श राज्यशिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका अनिता बोबडे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी प्राचार्या संगीता बैद यांनी शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत किमान क्षमता प्राप्त करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता नव्या उमेदीने येणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे, अपयश हे अधिक यश मिळविण्याची संधीच आहे. विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे कौशल्य ओळखून आपले करिअर निवडावे, जीवनात अनेक परीक्षांना सामोरे जायचे आहे तेव्हा विद्यार्थ्यांनी अधिक जोमाने ध्येयाचा पाठलाग करावा, असे मत श्रीकांत झाडे यांनी व्यक्त केले.
प्राचार्या बैद यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अधिक गुण मिळविण्यात कुठे कमी पडलात याचे आत्मचिंतन करावे, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक ज्योत्स्ना नरड यांनी केले, सूत्रसंचालन गोविंदा आदे यांनी केले, तर आभार कल्पना वैरागडे यांनी मानले.