मानवतेचा प्रत्यय : पाहता-पाहता गोळा झाला ५० हजारांचा निधीरत्नाकर चटप नांदाफाटाखेळण्या बागड्याच तिचं वय, तरीही शाळेत जाण्याची तिची जिद्द. चार वर्षांची होताच, तिने शाळेत जाणे सुरू केले. अशातच काळाचे घात केला आणि ती सुंदर पहाट तिच्या आयुष्यासाठी काळ ठरली. मात्र तिच्या सोबत शिकणाऱ्या, एकत्र जेवणाचा डबा खाणाऱ्या तिच्या मित्र-मैत्रीणींना आणि शिकविणाऱ्या शिक्षक, संचालक मंडळाने मदतीसाठी पुढाकार घेतला आणि पाहता-पाहता ५० हजार रुपयांचा निधी गोळा झाला.हा सामाजिक दायित्त्वाचा वसा जपला आहे, कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी. याच शाळेत नर्सरी वर्गात शिकणारी सिद्धेश्वरी राजू देवाळकर (मु.सांगोडा) ही काही दिवसांपूर्वी अंगावर गरम पाणी अंगावर पडल्याने ७० टक्के जळाली. तिला तातडीने उपचारासाठी वणी (जि.यवतमाळ) येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच, येथील प्राचार्य अॅलेक्झाड्रिना डिसुजा आणि शिक्षकांनी वणी येथे जावून सिद्धेश्वरीची भेट घेतली. यावेळी तिच्या जगण्याची आशा कुणालाच नव्हती. मात्र डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने तिच्या प्रकृतीत सुधार होऊ लागला. मात्र रुग्णालयाचा खर्च तिच्या पालकांना न पेलविणारा होता. दररोज पाच ते सहा हजार रुपये औषधांसाठी खर्च होत असल्याने घरची पुंजी संपली. शेती व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाला यावर्षी उत्पन्न झाले नाही. त्यामुळे सिद्धेश्वरीच्या उपचाराचा पूर्ण भार आईवर आला. शिक्षक भेटीसाठी आल्यानंतर आईचे डोळे पाणावले. आर्थिक अडचणीमुळे मुलीवर उपचार होऊ शकणार नाही, ही विवंचना आईने शिक्षकांजवळ सांगितली. शाळेत उत्तम गुण मिळवून आपल्या बुद्धीमत्तेची सर्वांना भुरळ घालणाऱ्या सिद्धेश्वरी जळाल्याने जखमी झाल्याची माहिती दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनाही कळली. विद्यार्थीही मदतीसाठी पुढे सरसावले. दुसऱ्या दिवशीपासून ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे कुणी १०० कुणी ५० तर कुणी २० ते ३० रुपये मदत दिली. यातून तब्बल ५० हजार रुपये गाळा झाले. विद्यार्थ्यांच्या या आर्थिक मदतीमुळे सिद्धेश्वरीच्या पुढील उपचाकरासाठी मोठी मदत होणार आहे. (वार्ताहर)
जखमी सिद्धेश्वरीला विद्यार्थ्यांनीच दिला मदतीचा हात
By admin | Published: April 04, 2015 12:33 AM