फोटो
सिंदेवाही : कोरोना कहर कमी होताच दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यास सांगितले आहे. शाळा व्यवस्थापन याकडे लक्ष देऊन असले तरी विद्यार्थी एकमेकांच्या टेबलावर बसत आहेत. मास्क काढून ठेवत आहेत. यामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत.
विद्यार्थ्यांची तपासणी, सोशल डिस्टन्सिग, परिसर स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, तोंडावर मास्क, अंतराचे पालन या सर्व बाबींचे शाळा व्यवस्थापन तंतोतंत पालन करीत आहे. विद्यार्थ्यांच्या दररोज नोंदी घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटर, थर्मलद्वारे तपासणी करून त्यांना वर्गात प्रवेश देण्यात येत आहे. या सर्व बाबींचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर झाला असून, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढे असूनही कोरोना पार्श्वभूमीवर पाचवी ते सहावी वर्गातील विद्यार्थ्यांना सांभाळताना शिक्षकांची दमछाक होत आहे. वर्गातून शिक्षक तासिका घेऊन नजरेआड होताच विद्यार्थी एक दुसऱ्याशी बोलणे, खेळणे, एकमेकांच्या टेबलवर बसणे, तोंडावरून मास्क काढणे, या बाबी आता वर्गात सुरू असल्याने दिसून येते. शिक्षकांनी कितीही सांगितले तरी हे विद्यार्थी ऐकत नसल्याने आता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.