कंत्राटदाराचा मनमानी कारभार : दिले जात आहे निकृष्ट आणि अपुरे जेवण चंद्रपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शासन नानाविध योजना राबवित असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे दिसून येत आहे. पोटभर आणि विद्यार्थ्यांनी ठरविलेला मेनू जेवणात द्यावाच लागेल, असा शासकीय नियम असतानाही वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट आणि अपुरे जेवण दिले जात आहे. याबाबतची तक्रार करण्यासाठी मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी काल शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.येथील समाजकल्याण विभाग कंत्राटदाराच्या मदतीने सध्या वरणभात नावाचा उपक्रम राबवित असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सर्व नियम सबंधित कंत्राटदार पायदळी तुडवित आहे. विद्यार्थ्यांना पुरेसे अन्नही देत नाही. मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. याची तक्रार विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.समाजकल्याण विभागाचे येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे. जिल्हाभरातील ग्रामीण आणि आर्थिकदृष्टया कमकुवत विद्यार्थी येथे राहतात. प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे येथे एकूूण ६५ विद्यार्थी आहेत. या वसतिगृहातील खानावळीचे कंत्राट अग्रवाल नामक व्यक्तीला मिळाले आहे. मागील दोन वर्षांपासून तो विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नियमानुसार विद्यार्थी आणि कंत्राटदार मिळून मेनू सांगतात. तो सर्वसंमतीने ठरल्यानंतर तो द्यावाच लागतो. परंतु कंत्राटदार मनात येईल तसे जेवण विद्यार्थ्यांना देतो. याची तक्रार केली तर कंत्राटदाराकडून दमदाटी केली जाते. त्यामुळे आजपर्यंत प्रकरण वसतिगृहाच्या बाहेर आले नव्हते. मात्र अखेर विद्यार्थ्यांचा राग गुरुवारी रात्री अनावर झाला. कंत्राटदाराने विद्यार्थ्यांना केवळ वरण आणि भातच खायला दिले. विद्यार्थ्यांनी खाण्यास नकार दिला. संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला सूचना केल्या. त्यानंतर रात्री दीड वाजता विद्यार्थ्यांना जेवण मिळाले. दरम्यान नेहमीच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.गृहपाल रात्री उपस्थित नसतातया वसतिगृहात गृहपाल म्हणून महिला आहे. त्या सध्या प्रसूती रजेवर आहेत. त्यांच्या जागी वरोरा येथील एकाची प्रभारी गृहपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेही रात्री उपस्थित नसतात, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.
वसतिगृहातील विद्यार्थी जिल्हा कचेरीवर धडकले
By admin | Published: September 18, 2016 12:55 AM