चंद्रपूर : चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी धानोरकर आरोग्यधाम व वनस्पती संशोधन केंद्राला भेट देऊन आयुर्वेदिक औषधी वनस्पती बाबत माहिती जाणून घेतली. डॉ. राजीव धानोरकर, डॉ. माधुरी धानोरकर यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक वनस्पती औषधीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
आयुर्वेदिक अनेक वनस्पतींचे जतन व संवर्धन होत नसल्याने त्या लुप्त होत चालल्या आहेत. त्यामुळे नव्या पिढीला आयुर्वेदिक वनस्पतीचे ज्ञान राहावे, या उद्देशाने शालेय उपक्रमांतर्गत जाधव मॅडम यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी धानोरकर आरोग्यधाम वनस्पती व संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी डॉ. राजीव धानोरकर, डॉ. माधुरी धानोरकर यांनी आरोग्यधाम येथील वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. तसेच दैनंदिन वापरात वनस्पतींचा आरोग्यास हितकारक उपयोग कसा करायचा, वनस्पती कशा ओळखायच्या, त्यांच्या औषधी गुणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. हिरडा, आवळा, शतावरी, अश्वगंधा, गुळवेल, हडजोड, निगुंडी, वासा, वेखंड, चंदन, सप्तपर्ण अशा अनेक वनस्पतींचे औषधी ज्ञान त्यांना मिळाले. विद्यार्थ्यांनी निसर्गाचे महत्त्व जाणून हा वारसा पुढे चालवावा, यासाठी त्यांना अनेक औषधी वनस्पतींच्या रोपट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.