चंद्रपूर : येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्रमांक दोनतर्फे चंद्रपूर जिल्ह्याचे तथा महाराष्ट्र राज्याचे अर्थ नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विद्यार्थ्यातर्फे वसतिगृहाच्या शासकीय इमारतीसाठी वीर बाबूराव शेडमाके शहीदभूमीत गुरूवारी निवेदन देण्यात आले. चंद्रपूर हे गोंडराजाचे ऐतिहासिक शहर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरीसुद्धा चंद्रपूरसारख्या औद्योगिक जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी वसतिगृहाची शासकीय इमारत नाही. वसतिगृह स्थापन होऊन अनेक वर्षे झाली, पण शासकीय इमारत नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना खासगी इमारतीमध्ये सोईसुविधांअभावी मनस्ताप सहन करावा लागतो. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला जातो; पण आदिवासी विद्यार्थ्यांना याचा कोणताही लाभ मिळत नाही.चंद्रपूरमध्ये दोन मुलांचे व दोन मुलींचे शासकीय वसतिगृह भाड्याच्या इमारतीमध्ये कार्यरत आहेत. या भाड्यापोटी शासनाला दरवर्षी लाखोचा निधी द्यावा लागतो.ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याच वर्षी वसतिगृहाचे बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन दिले. सर्वच आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वित्तमंत्र्यांना विद्यार्थ्यांचे निवेदन
By admin | Published: October 24, 2015 12:37 AM