चंद्रपूर : शालेय पोषण आहार योजना विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू न झाल्यामुळे राबवली जाणार नाही, तर प्रतिविद्यार्थी निधी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते तत्काळ काढण्याचे आदेश शासनाने दिली आहे. मात्र, कोरोना काळात पालकांना खाते काढायला बऱ्याच अडचणी येत आहेत. बँक खाते काढण्याची सक्ती न करता पालकांचे खाते ग्राह्य धरावे, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. यासंदर्भात निवेदनही देण्यात आले आहे.
बऱ्याच विद्यार्थ्यांनी खाते यापूर्वीच काढले आहे. बँकांनी या खात्यात बॅलन्स न ठेवल्यामुळे दंड वसूल करणे, पासबुक न देणे, खाते बंद करणे अशी कामे बँकांनी केल्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी बँक खात्याविना आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाहीत तर काहींचे आधार चुकीचे असल्याने ते लिंक नाही. सध्या कोरोनाकाळात खेड्यापाड्यातील पालकांना शहरात येऊन खाते काढणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार डीबीटी योजनेसाठी पालकांचे खाते ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
डीबीटी शालेय पोषण आहार योजनेसाठी पालकांचे खाते ग्राह्य धरण्यात यावे व विद्यार्थी खाते काढायला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणीही महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहे.