चंद्रपूर : तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यामुळे दात व शरीरावर परिणाम होतो. यामुळे कॅन्सरसारख्या आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावे तसेच कुटुंबीयांना यापासून दूर राहण्यास सांगावे, असे आवाहन दंतचिकित्सक डाॅ. प्रवीण घोडे यांनी व्यक्त केले.
ते येथील न्यू इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे आयोजित दंतचिकित्सा मार्गदर्शन शिबिराप्रसंगी बोलत होते. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील स्मार्ट सिटीच्या संस्थापक अध्यक्ष विद्या बांगडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रमा गर्ग, क्लबच्या सदस्या गुप्ता, उमाटे, प्राचार्य हरिहर भांडवलकर, पर्यवेक्षिका संगीता बैद यांची उपस्थिती होती. यावेळी विद्या बांगडे, प्राचार्य भांडवलकर यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक व संचालन कल्पना वैरागडे, आभार अनिता बोबडे यांनी मानले.