सुधीर मुनगंटीवार : बाबा आमटे स्मृती अभ्यासिकेचे लोकार्पणचंद्रपूर : मानवाने स्वत:सोबतच जगाचा विचार केला पाहिजे, ही भावना बाबा आमटे यांनी रुजविली. आपल्या आयुष्यात अखंडपणे त्यांनी दु:खितांची सेवा केली. त्यांच्याच विचाराला पुढे नेत त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेतील विद्यार्थी जिल्हयाचे नाव मोठे करतील, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. प्रसिध्द समाज सेवक बाबा आमटे यांच्या स्मृतिनिमित्त बांधण्यात आलेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विकास आमटे, आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील आदी उपस्थित होते.बाबा आमटे यांच्यावर काढण्यात आलेल्या डाक तिकिटाच्या विमोचनप्रसंगी बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ अद्ययावत अभ्यासिका उभारण्याचा मनोदय पालकमंत्र्यांनी व्यक्त केला होता, हे विशेष.बाबांनी आपल्या शिकवणूकीतून पवित्र वातावरण निर्माण केले. त्यांची तिसरी व चौथी पिढीही दु:खीतांच्या सेवेत आहे. ही अव्दितीय बाब असून बाबांच्या शिकवणीतून हे घडले आहे. शिक्षण महत्वाचे आहे. वंचितांना पुढे नेण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. याच भावनेतून बाबांच्या स्मतीप्रित्यर्थ अभ्यासिका तयार करण्यात आली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. कोणीही गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये. स्पर्धा परीक्षेची तयारी गरीब कुटूंबातील विद्यार्थ्यांना करता यावी, यासाठी ही अभ्यासिका महत्वाची ठरणार असल्याचे ते म्हणाले. अशी आहे अभ्यासिकादोन कोटी ६५ लाख रुपये खर्च करुन सदर अभ्यासिका बांधण्यात आली आहे. अभ्यासिकेच्या तळमजल्यावर ३८ संगणक क्षमता असलेली ई लायब्ररी,२० हजार पुस्तकांची क्षमता असलेल्या बुक रॅक्स व प्रसाधन गृहे तसेच पहिल्या मजल्यावर १५० विद्यार्थी क्षमतेचा अभ्यासिका हॉल व लेक्चर हॉल, प्रसाधन गृहे आहेत.
अभ्यासिकेतील विद्यार्थी जिल्ह्याचे नाव मोठे करतील
By admin | Published: February 11, 2017 12:33 AM