लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची महाविद्यालयाची ६० टक्के शुल्क शिष्यवृत्तीच्या स्वरूपात केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे शुल्क या शिष्यवृत्तीच्या रकमेतून अदा न करता महाविद्यालयाची फसवणूक केली आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर ती सात दिवसांच्या आत महाविद्यालयाला देणे बंधनकारक आहे. असे असतानाही विद्यार्थ्यांनी यामध्ये हयगय केली आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करून महाविद्यालयाची फी वसूल करावी, या संदर्भातील पत्र येथील सोमय्या पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांनी केंद्र, राज्य शासनासह, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठविले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची सत्र २०२१-२२, २२-२३ आणि २०२३-२४ या पहिल्या हप्त्याची शिष्यवृत्तीची ४० टक्के रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे संस्थेच्या बँक खात्यात जमा केली आहे. दुसऱ्या हप्त्याची ६० टक्के शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या एनएसपी स्कॉलरशिप पोर्टलवरून पीएफएमएस प्रणालीद्वारे जमा करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार महाविद्यालयाची ६० टक्के फी शिष्यवृत्तीच्या स्वरूपात केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात म्हणजे, यापूर्वी ज्या बँक खात्यात स्कॉलरशिप येत होती, त्या बँक खात्यात १ जानेवारी २०२५ रोजी जमा केली आहे. केंद्र आणि राज्य शासन यांच्या निर्णयानुसार महाविद्यालयाची स्कॉलरशिपच्या स्वरूपात आलेली रक्कम विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या बँकेच्या खात्यात सात दिवसांच्या आत जमा करणे बंधनकारक आहे. असे असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी ती रक्कम महाविद्यालयाच्या खात्यात जमाच केलेली नाही. परिणामी, महाविद्यालयाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
२४ लाखांवर रक्कम अडकलीसन २०२१-२२ तसेच २३ या सत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या १३ विद्यार्थ्यांनी ६० टक्केचे शिष्यवृत्तीची रक्कम ५ लाख ३४ हजार ६००, सत्र २०२३-२४ मधील ६० टक्के शिष्यवृत्ती ४ लाख ९५ हजार ४००, असे एकूण १० लाख ३० हजार रुपये विद्यार्थ्यांनी जमाच केले नाहीत. दरम्यान, बँकेचे स्टेटमेंट जोडलेल्या २०२१-२२ आणि २०२२-२३ या सत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या १४ विद्यार्थ्यांचे एकूण ६ लाख ५१ हजार ४०० व सत्र २०२३-२४ या सत्रातील १७ विद्यार्थ्यांचे एकूण ८ लाख १७ हजार २०० रुपये, अशी एकूण १४ लाख ६८ हजार ६०० रुपयांची शिष्यवृत्ती अद्यापपर्यंत जमा करण्यात आली नसल्याचे प्राचार्यांनी पत्रात म्हटले आहे.